नागपूर : वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळेला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची चौकशी सुरु आहे. कालपासूनच्या चौकशीनंतर आरोपी विक्कीने हे कृत्य एकतर्फी प्रेमातूनच केल्याचं स्पष्ट झालं आहे. एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं भयंकर कृत्य करुन देखील आरोपी विक्की नगराळे याला त्याचा काहीही पश्चाताप झाला नसल्याचं समोर येत आहे. पीडित तरुणीची प्रकृती कशी आहे, याची साधी विचारणा देखील तो करत नाही, असं पोलीस सूत्रांकडून समजत आहे.


पीडित तरुणी आपल्याला वारंवार टाळत होती. ती व्हॉट्सअॅपवर ऑनलाईन असून सुद्धा माझ्याशी बोलत नव्हती, माझ्या मेसेजला रिप्लाय देत नव्हती, असं आरोपी विक्की नगराळेचं म्हणणं आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे. एकाच गावात राहत असल्याने एकमेकांची नेहमी भेट होत होती. मात्र पीडित तरुणी बोलणं टाळत असे, याचाच राग कदाचित विक्कीच्या मनात होता आणि याच नैराश्येतून त्याने हे कृत्य केलं असावं.


विक्की आणि पीडित तरुणी अनेकदा शिक्षणासाठी एकाच बसमधून प्रवास करायचे. आरोपी विक्कीने 12 वीनंतर आयटीआयचा कोर्स केला होता. त्यामुळे त्याला मनासारखी नोकरी मिळत नव्हती. तर दुसरीकडे पीडित तरुणी शिक्षणात हुशार होती. तिने 12 वीनंतर बीएस्सी आणि त्यानंतर एमस्सीपर्यंत शिक्षण घेतलं होतं. याच शिक्षणाच्या जोरावर तिला प्राध्यापिकेची नोकरी मिळाली होती. हीच ईर्ष्या आरोपीच्या मनात असण्याची शक्यता आहे. आरोपीची पोलीस आणखी कसून चौकशी करत आहेत.


पीडित तरुणीची प्रकृती अजूनही गंभीर आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरु आहेत. तिची त्वचा जळाली आहे. तर श्वसनप्रक्रियेवरही परिणाम झाला आहे. तोंड आणि नाकातून मोठ्या प्रमाणात धूर तिच्या शरीरात गेल्यानं तिच्या फुफ्फुसांवर परिणाम झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. आरोपीच्या कृत्याचा राज्यभरातून तीव्र शब्दात निषेध केला जात आहे. आरोपीला फाशीचीच शिक्षा द्यावी, अशी मागणी जात आहे. या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ आज सर्वपक्षीयांकडून हिंगणघाट बंद पुकारण्यात आला आहे.


संबंधित बातम्या


धक्कादायक! वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न


Special Report | हिंगणघाटचं छपाक प्रकरण : हिंगणघाटात भर रस्त्यात तरुणीला जाळण्याचा प्रयत्न