नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजूर झालं आहे. परंतु विरोधी पक्ष आणि देशभरातील हजारो लोक या विधेयकाला विरोध करत आहेत. हे विधेयक संविधानाच्या मुलभूत सिद्धांतांच्या विरोधात असल्याचे विरोधी पक्षाचे म्हणणे आहे. तर दुसऱ्या बाजूला मोदी सरकारचे म्हणणे आहे की, या विधेयकामुळे संविधानामधील कोणत्याही कलमाचे उल्लंघन होत नाही. एका बाजूला या विधेयकावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरु असताना, दुसऱ्या बाजूला भारतात आलेल्या हिंदू, पारशी, ख्रिश्चन, शीख शरणार्थींमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.


पाकिस्तानमधून दिल्लीत आलेला एक हिंदू परिवार या ऐतिहासिक घटनेचे सेलिब्रेशन करत आहे. हा परिवार 2011 साली पाकिस्तानातून भारतात आला आहे. परंतु अद्याप या कुटुंबाला भारताचं नागरिकत्व मिळालेलं नाही. या कुटुंबातील आरती नावाच्या एका महिलेने सांगितले की, तिचे भविष्य या विधेयकावर अवलंबून आहे.

आरतीला दोन लहान मुलं आहेत. तिचं एक बाळ दोन वर्षांचं आहे, तर दुसरं बाळ हे केवळ सहा दिवसांचं आहे. दुसऱ्या बाळाचं बारसं झालेलं नव्हतं. परंतु काल नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर आरतीने तिच्या बाळाचं बारसं केलं. आरतीने तिच्या बाळाचं नाव 'नागरिकता' असं ठेवलं आहे.

'नागरिकता'च्या आजीने सांगितले की, हे विधेयक मंजूर होईल आणि आम्हाला देशाचे नागरिकत्व मिळेल, या आशेवर आमच्या संपूर्ण कुटुंबाने 'नागरिकता' हे नाव ठेवलं आहे. जेव्हा बाळ जन्माला आले तेव्हापासून देशभरात नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर चर्चा सुरु आहेत. त्यामुळेच आम्ही तिचे नाव नागरिकता ठेवले आहे.