सोलापूर : महाविकास आघाडीतील भाग म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना कृषीमंत्री पद देण्यात यावे, अशी मागणी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. तर सत्तेत सन्मानजनक स्थान दिलं तरच सत्तेत सहभागी होऊ, अशी भूमिका राजू शेट्टी यांनी मांडली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची प्रदेश कार्यकारिणी बैठक सोलापुरात काल पार पडली. यावेळी विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.
यामध्ये संघटनवाढीसाठी तसेच संघटनेच्या पुर्नबांधणीसाठी गाव पातळीपासून राज्यपातळी पर्यंतच्या सर्वच समित्या बरखास्त करण्याचा निर्णय राजू शेट्टी यांनी जाहीर केला. अनेक लोकांचा त्यांच्या पदावरील दोन वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. तसेच अनेक नव्या दमाच्या नेतृत्वांना संधी द्यायची आहे. पक्षाची पुनर्बांधणी करायची आहे. त्यासाठी कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं राजू शेट्टींनी सांगितलं.
राजू शेट्टी यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असून महाविकास आघाडीने त्याचा फायदा करुन घ्यावा. राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीत कृषीमंत्री पद देण्यात यावं, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. मात्र आपण सत्तेसाठी कोणाच्या ही दारात कटोरा घेऊन जाणार नाही. महाविकास आघाडीने सन्मानजनक स्थान देण्याचा प्रस्ताव दिला तरच सत्तेत सहभागी होऊ, असं मत राजू शेट्टी यांनी मांडलं.
सत्तेत सहभागी जरी झालो तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करत राहणार आहे. शेतकऱ्यांचा सात बारा कोरा व्हावा ही प्रमुख मागणी आमची असल्याचंही राजू शेट्टी यांनी सांगितलं. दरम्यान अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या बॅनरखाली 8 जानेवारी रोजी ग्रामीण भारत बंदची हाक देण्यात आली आहे. आरसीईफ करारामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असून याचाच विरोध करण्यासाठी ग्रामीण भारत बंद करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
सदाभाऊ खोतांचे दोष माहिती होते, मात्र चळवळीसाठी पांघरुण घातलं
राजू शेट्टी यांचे जुने सहकारी सदाभाऊ खोत यांच्याबद्दलही राजू शेट्टी यांनी वक्तव्य केलं. "माणसं ओळखण्यात मी चुकतो, असं नाही. मात्र चळवळ वाढवण्यसाठी काही गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागतात. सदाभाऊ खोतचे दोष आधीपासून माहिती होते. मात्र चळवळ वाढवण्यासाठी त्यावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला, असं म्हणत राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांना टोला लगावला.