बुलडाणा : नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात येत न येत तोच सरकारने आता या मार्गालगत मुंबई नागपूर हायस्पीड ट्रेनचा प्रोजेक्ट सरकारने हाती घेतला आहे. यासंबंधीच व या हायस्पीड ट्रेनच बुलडाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सादरीकरण देण्यात आलं.  यावेळी प्रशासन व रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यामुळे आता राज्यातील जनतेला या हायस्पीड बुलेटट्रेन बद्दल माहिती मिळाली आहे.


बुलेट ट्रेन म्हटलं की आपल्याला फक्त मुंबई - अहमदाबाद या ट्रेन विषयीच मनात येते. पण, आता रेल्वेने महाराष्ट्रातील जनतेला सुद्धा सुखद धक्का दिला आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या बाजूने आता महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यातून हायस्पीड बुलेट ट्रेन धावणार असून आज बुलडाण्यात या हायस्पीड ट्रेनच रेल्वेचे समाज विकास अधिकारी श्याम चौघुले यांनी जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यासमोर सादरीकरण दिलंय. या हायस्पीड ट्रेनचा D.P.R बनविण्याच काम देखील सुरू झालं असून आता या 10 जिल्ह्यात स्थानिक प्रशासन व रेल्वे कमिटी याबद्दल काम सुरू करणार आहेत.


हायस्पीड बुलेट ट्रेनची वैशिष्ट्य



  • 10 जिल्ह्यातून रेल्वे मार्ग जाणार 

  •  नागपूर मुंबई फक्त साडेतीन तासात होणार प्रवास

  • जास्तीत जास्त 350 किमी प्रति तास वेग या ट्रेनचा असेल.

  • या ट्रेन मध्ये एकावेळी जास्तीत जास्त 750 प्रवास करू शकतील.

  • बुलडाणा जिल्ह्यातील 1245 हेक्टर जमीन मार्गासाठी लागणार.

  • बुलडाणा जिल्ह्यात मेहकर रेलवे स्टेशन राहिल 

  • जंगल परिसरात बोगदे तयार करण्यात येईल 

  •  नागपूर ते ठाणे 370 गावे प्रभावित होणार आहे 

  • बुलडाणा जिल्ह्यातील 47 गावे येणार आहे 

  • बुलडाणा  जिल्ह्यातून 87 किमी  जाणार आहे

  • जिल्ह्यातील मेहेकर  लोणार सिंदखेडराजा देउळगावराजा अशा तालुक्यातून जाणार 

  • जमिनिचे थेट खरेदी पद्धत राहिल.

  • शहरात अडीच टक्के ग्रामीण भागातील जमिनिची रक्कम पाचपट देण्यात येणार आहे.


 बुलडाणा जिल्ह्यात या हायस्पीड लोहमार्गाचं प्रकल्पाचं सादरीकरण झालंय. लवकरच या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच DPR  तयार करण्याचं काम सुरू होणार असून हा अहवाल तयार झाल्यावर तो जागतिक बँकेकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर जागतिक बँकेने मंजूर केल्यावरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.


 कधीकाळी स्वप्नवत वाटणारी हायस्पीड बुलेट ट्रेन आता राज्यातील दहा जिल्ह्यातून धावणार असल्याचा विचारच आपल्याला स्वप्नात घेऊन जातो. प्रत्यक्षात हायस्पीड ट्रेन मुंबई ते नागपूर अशी धावणार असून याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचं कामही सुरू झालंय. यामुळे मात्र विदर्भातील शहर मुंबईच्या अगदी जवळ येत असून नागपूर मुंबई प्रवास फक्त साडे तीन तासात होणार आहे.