मुंबई - राज्यात गेल्या चार दिवसांपासून वातावरण अचानक फिरलं असून अनेक जिल्ह्यांना अवकाळी (Rain) पावसाचा तडाखा बसला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या (Farmer) फळबागांचं मोठं नुकसान झालं असून बळीराजा चिंतेत पडला आहे. एकीकडे कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असताना दुसरीकडे वळवाच्या पावसाने शेतकऱ्यांचं अनोतान नुकसान केलंय. पावसामुळे काहीसा गारवा दिसत असला तरी, नंतर उकाडा वाढण्याचं कारणही हाच वळवाचा पाऊस ठरतो आहे. विदर्भ ते मध्य अरबी समुद्रातील सक्रीय ट्रॉफमुळे हा पाऊस पडत असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. पश्चिमेच्या दिशेने हा ट्रॉफ सरकू लागल्याने पाऊसाने पश्चिम महाराष्ट्रासह, कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये एंट्री केली आहे. सोलापूर, पुणे (Pune), कोल्हापूर, धाराशिव जिल्ह्यासह कोकणताही मुसळधार पाऊस पडल्याचे दिसून येते.


लातूर जिल्ह्यात अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली असूनकाही भागात गारांचा पाऊस पडल्याचं दिसून आलं. त्यामुळे काही ठिकाणी आंबा आणि द्राक्षे बागांचं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे अक्कलकोटमध्येही तुफान पाऊस (Akkalkot Rain) पडला असून बसलेगाव ते गरोळगी या दोन गावाची वाहतूक बंद झाली आहे.शुक्रवारी काही जिल्ह्यात कमी अधिक पाऊस झाल्यानंतर आज पुन्हा एकदा पुणे, सोलापूर, धाराशिव, सातारा आणि कोकणात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात पावसाचे पाणी शिरल्याचेही व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आले आहेत.



ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह काही गावांत झाडे उन्मळून पडली आहेत. लातूर जिल्ह्यात शनिवारी दुपारपासूनच ढग दाटून आले होते. आज दुपारीच जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केल्याचं दिसून आलं. अचानक सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. राजकीय नेत्यांच्या सभांनाही या पवासाचा फटका बसत असून अनेक गावातील सभांच्या वेळा आणि ठिकाणं ऐनवेळी बदलण्यात आली आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातही पावसाने हजेरी लावली आहे. तर, कोल्हापुरात दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस कोसळला. जिल्ह्यातील तापमान २२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. दुसरीकडे कोकणातही सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचे इशारा दिला आहे. हिंगोली जिल्ह्यातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तर, सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, बार्शी तालुक्यासह विविध ठिकाणी पावसाने झोडपले आहे.    


अंगावर वीज पडून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू 


दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती गावात घडली मन हेलावून टाकणारी घटना घडली असूनमुस्ती गावातील शेतात वीज पडून लावण्या हनुमंता माशाळे या 8 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. लावण्या माशाळे हिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. धक्कदायक घटनेमुळे संपूर्ण दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. 


शेतातील हळद केळी सह भाजीपाला वर्णीय पिकांचे नुकसान 


हिंगोली जिल्ह्यांमध्ये सायंकाळच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि वादळ वाऱ्यासह जोरदार स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला आहे  
उकाड्याने त्रस्त झालेल्या या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी शेतातील हळद, केळी, आंब्याच्या बागा आणि भाजीपालावर्णीय पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे,  त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत