Maharashtra Rain News : राज्याच्या काही भागात सध्या जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे, तर काही भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. दरम्यान, उद्यापासून मुंबईत (Mumbai) मुसळधार पावसाचा इशारा ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिला आहे. माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहिती 18 ते 25 जूनपर्यंत आठवडाभर, मुंबईसह उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे.


कुठं मध्यम तर कुठं जोरदार पावसाची शक्यता


दरम्यान, (18 ते 22 जून) च्या पाच दिवसात विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश तसेच नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अशा 29 जिल्ह्यात केवळ तुरळक ठिकाणीच मध्यम पावसाची शक्यता आहे. तर उद्या आणि परवा (मंगळवार व बुधवार) कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर गोंदिया गडचिरोली या भागात दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता असल्याचे खुळे म्हणाले. दरवर्षी मान्सूनच्या आगमन व वाटचालीत त्याच्या प्रवाहात दिसणारा जुन महिन्यातील कमकुवतपणा ह्यावर्षीही दिसून आला आहे. अरबी समुद्रावरुन महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर फक्त पश्चिमी बळकट मान्सूनी वारे वाहत आहे. या व्यतिरिक्त मान्सूनच्या पावसासाठी विशेष अशी कोणतीही तीव्र स्वरुपातील वातावरणीय प्रणाली महाराष्ट्रासाठी जाणवली नाही. म्हणून महाराष्ट्रात मान्सून थबकल्याचे जाणवत असल्याचे खुळे म्हणाले. 


मान्सून त्याच्या सरासरी तारखेप्रमाणे वाटचाल सुरु


दरवर्षी, मान्सून प्रवाह, त्याच्या वाटचालीत, केरळ ते कर्नाटक प्रवासानंतर, जून मध्यावर सहसा, कमकुवत होवून, कर्नाटकातच मुक्काम ठोकत असे. पण यावर्षी मात्र त्याने फक्त जागा बदलून, काहीसे पुढे येऊन त्याने महाराष्ट्रात मुक्काम ठोकला असल्याचे खुळे म्हणाले. एखाद्या दोन दिवसाच्या फरकाव्यतिरिक्त, मान्सून त्याच्या सरासरी तारखेप्रमाणे त्याच्या वाटचालीत बरोबर असल्याचे खुळे म्हणाले. 


शेतकरी पेरणीच्या तयारीत


सध्या कोकणात जरी जोरदार पाऊस  होत असला तरी आजची स्थिती पाहता, महाराष्ट्रात अजूनही खान्देश, मराठवाडा, विदर्भात पूर्णतेने मान्सून पोहोचलेला नाही. गेल्या पाच दिवसा पासून मान्सूनच्या दोन्हीही शाखा जागेवरच खिळलेल्या दिसत आहेत. पाच दिवस (14 ते 18 जून) पावसाचा जोर कमी होणार म्हटल्यावर महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. तर काही शेतकरी चांगल्या पावसाची अद्याप वाट बघत असल्याचे खुळे म्हणाले.


महत्वाच्या बातम्या:


मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट, हवामान विभागाचा आजचा अंदाज काय?