वाशिम : मुंबईकडे पावसाने दडी दिल्यानंतर हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज मराठवाडा आणि विदर्भात पावसाने दाणादाण उडवली आहे. हिंगोली, वाशिम, परभणी, बुलडाणा जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला असून गावागावातील ओढ्यांना पाणी आलं आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून पावसाच्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. गावखेड्यात पुलांवरुन पाणी वाहत असल्याने इकडून-तिकडं जाणंही कठीण बनलं आहे. मात्र, काही ग्रामस्थं जीव धोक्यात घालून प्रवास करताना दिसून येतात. वाशिम जिल्ह्यात अशाच पाणी वाहणाऱ्या पुलावरुन एका आजोबांनी जीव धोक्यात घालून प्रवास केला. वयोवृद्ध आजोबांनी धावत्या ओढ्यातून मार्ग काढण्यासाठी केलेलं धाडस त्यांच्या चांगलंच अंगलट आलं होतं. या धाडसी बाणामुळे पुलावरुन जात असताना पाण्यात त्यांचा पाय घसरला आणि ते पुलावरील पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले. या पुलावरील पाणी वाहत असताना पूल पार करणे आजोबांच्या जीवावर बेतलं होतं. मात्र, आजोबा पुराच्या पाण्यात वाहत जात असल्याचं पाहताच पुलाच्या आजुबाजूकडे उभा असलेल्या ग्रामस्थांनी वाहत्या पाण्यात उड्या घेत अखेर आजोबांना गाठलं आणि पाण्यातून सुखरुप बाहेर काढलं. 


वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यात आज दुपारी मुसळधार पाऊस बरसला असून जयपूर-शहा गावाच्या लगत असलेल्या पुलावरुन पावसाच्या पुराचं पाणी होतं. त्यामुळे, पुलाच्या दोन्ही बाजूकडील वाहतूक बंद झाली असतानाही एका वयोवृद्ध आजोबांनी नसतं धाडस करुन पुलावरुन जीवघेणा प्रवास केला. मात्र, हे धाडस आजोबांच्या जीवावर बेतता बेतता राहिलं. पुलावरुन पाणी वाहताना आजोबांनी चालत चालत पूल पार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा प्रवाह गतीमान असल्याने त्यांचा पाय घसरला आणि ते पाण्यात पडले. आजोबांना ओढ्यात वाहून जाताना दोन्ही बाजूला पुलावर उभ्या राहिलेल्या ग्रामस्थांनी पाहिलं आणि तात्काळ ओढ्यात उड्या घेतल्या. ग्रामस्थांनी एकोप्याने धावपळ करत अर्धा किलोमीटर दूरपर्यंत जाऊन आजोबाला वाचवलं. आजोबा चक्क अर्धा किलोमीटरपर्यंत वाहत गेले होते, पण येथील जिगरबाज युवकांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून ओढ्याच्या पाण्यात उड्या घेऊन अर्धा किमीपर्यंत पोहोत जाऊन आजोबांना सुखरुप बाहेर काढलं. त्यामुळे, इतर उपस्थितांचा जीव भांड्यात पडला.   


दरम्यान, येथील पुलावर पाणी वाहताना अनेकांनी ट्रॅक्टरवर बसवून काही नागरिकांना वाहत्या पुलाच्या पाण्यातून दुसरीकडे पोहोचवलं. यावेळी ट्रॅक्टर चालवण्याचं धाडस केले, सुदैवाने कोणताच अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, पुलावरुन वाहणारं पाणी पाहता नसती उठाठेव का बरं करावी, असाही प्रश्न निर्माण होत आहे. तसेच, काही स्थानिकांनीही या जीवघेण्या प्रवासाला विरोध केल्याचं दिसून आलं. तर, काहींनी पुलाची उंची वाढवावी, अशी मागणीही प्रशासनाकडे केली आहे. 


हेही वाचा


Heavy Rain : मराठवाडा, विदर्भात पावसाने दाणादाण; ATM पाण्यात, शेकडो हेक्टर शेतीचंही नुकसान