Vidarbha Rain : हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार विदर्भात सध्या मुसळधार पाऊस (Vidarbha Heavy Rain) सुरु आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. यामुळं वाहतुकीवर देखील परिणाम होत आहे. गेल्या 24 तासात गडचिरोलीच्या (Gadchiroli) सिरोंचा भागात तब्बल 183 मिमी पावसाची नोंद झालीय. सिरोंचात ढगफुटी पाऊस झाल्यानं नदी नाल्याला पूर आला होता. यानंतर एका शाळेत अडकलेल्या 75 विद्यार्थ्यांना रेस्क्यू करण्यात आलं आहे.
गडचिरोली, भंडारा व नागपूर जिल्याच्या काही भागात पूर परिस्थितीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सखल व नदीकाठावरच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, नागपूरच्या वाडी, हिंगणा, डवलामेटी, सुराबर्डी भागात गेले दोन तास दमदार पाऊस होत आहे. विजांच्या कडकडाटासह पहाटेपासून पाऊस सुरू असून दृश्यमानता ही कमी झाली आहे.
राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागानं आज राज्यातील दोन जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये रत्नागिरी आणि विदर्भातील गडचिरोली या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे. या दोन्ही जिल्ह्यात अतिमुसळधार ते अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्यामुळं या दोन जिल्ह्यातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील नऊ जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा मराठवाड्यातील नांदेड, विदर्भातील गडचिरोली, वर्धा, नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर मुंबईसह पालघर उत्तर महाराष्ट्र आणि संपूर्ण मराठवाड्यात पावसाचा यलो अल्ट जारी करण्यात आला आहे.
रायगडसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जोरदार पाऊस
सध्या रायगडसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरु आहे. रायगड जिल्ह्याला आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. रायगड जिल्ह्याला आज आणि उद्या सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. रोहा येथील कुंडलिका नदी ही काल झालेल्या पावसामुळं दुथडी भरुन वाहताना दिसत आहे. त्यामुळं रोहा शहरातील नागरीकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. किनाऱ्यावरील नागरिकांना सुरक्षीत स्थळी स्थलांतर होण्याच्या सूचना रोहा नगरपरिषदेने केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
आज महाराष्ट्रात पडणार मुसळधार पाऊस, 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट तर 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, वाचा हवामान विभागाचा अंदाज