Rain Update News : नवी मुंबईसह (Navi Mumbai) ठाणे (Thane), पनवेल (Panvel) परिसरात पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळं सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे. रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं असून, अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच अनेकांच्या चारचाकी आणि दुचाकी वाहून गेल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. तर काही नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच घरात पाणी शिरल्याने नागरिकांना घराबाहेर पडण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. 


रात्रीपासून शहापूर परिसरात मुसळधार पाऊस, पावसाचा लोकलला फटका 


रात्रीपासून शहापूर परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाचा फटका लोकलला देखील बसला आहे. आडगाव तानसेत दरम्यान रेल्वे ट्रॅकवर माती आणि दगड आल्याने कसाराकडे जाणाऱ्या लोकल आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर परिणाम झाला आहे. रेल्वे ट्रॅकवरील माती दगड हटवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ओव्हर हेड वायरवर झाडे कोसळ्यामुळं वाहतूक 2 तास ठप्प झाली होती. काही वेळापूर्वी वाहतूक हळूहळू पूर्व पदावर येत आहे.


भारंगी नदीच्या पाण्यात वाहनं गेली वाहून


शहापूरमधील गुजरातीबाग, चिंतामणनगर, ताडोबा परिसर आणि गुजरातीनगर या परिसरामध्ये भारंगी नदीचे पाणी घुसल्याने पाच ते सहा फोर व्हीलर आणि वीस ते पंचवीस टू व्हीलर या वाहून गेल्या आहेत. त्यानंतर अनेक फोर व्हीलर आणि टू व्हीलर चे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर घरांमध्ये साधारण तीन फुटापर्यंत भारंगी नदीच्या पुराचे पाणी गेले आहे. त्यामुळं अनेक घरांचे नुकसान झालं आहे. स्थानिक नागरिकांची मागणी आहे की गुजराती बाग आणि चिंतामणी नगर या परिसरामध्ये नदीला बांधण्यात आलेली संरक्षण भिंतीमुळं खाली जाणारे पाणी हे अडून राहते आणि त्यामुळे येथील भागाला पुराचा फटका बसलेला आहे. नगरपंचायत आणि काही ठेकेदार आणि अधिकारी यांच्या संगणमताने यांच्या फायद्यासाठी हे नदीला संरक्षण कटरे बांधण्यात आलेले आहेत. त्यामुळं येथील नागरिकांचेमोठे नुकसान झाले आहे. हा कटरा त्वरित तोडण्यात यावा अशी नागरिकांनी मागणी केली आहे.


सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं


नवी मुंबईसह पनवेलमध्ये सकाळपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं पाणी साचण्यास सुरवात झाली आहे. आदई, सुकापूर भागातील गावात पाणी भरु लागले आहे. रस्त्यावर, सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. पनवेल आदई, सुकापूर भागात सोसायटी, घरात पाणी घुसले आहे. गाड्या पाण्यात आर्ध्या डुबल्या आहेत. सोसायटीतील रहिवाशांना घराबाहेर पडण्यात अडचणी येत आहेत. कमरेपर्यंत पाणी साचलं आहे. कळंबोली परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. कळंबोली भागात पुराचा धोका वाढला आहे. रस्त्यावर गाड्या अडकल्या आहेत. कार, परिवहन बस बंद पडल्या आहेत. रहिवाशांचे हाल होतायेत. 


मुंबईच्या पश्चिम उपनगरात आज पहाटेपासून पावसाची चांगली बॅटिंग


मुंबईच्या पश्चिम उपनगरात आज पहाटेपासून पावसाची चांगली बॅटिंग सुरु आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे परिसरात सध्या अधून मधून जोरदार पाऊस सुरु आहे. अंधेरी, जुहू, जोगेश्वरी परिसरात पावसाचा जोर जास्त असून मागील अर्धा तासापासून रिप रिप पाऊस सुरु आहे.


महत्वाच्या बातम्या:


कसं असेल राज्यातील हवामान? कुठं कुठं पडणार पाऊस? वाचा हवामान विभागाचा आजचा अंदाज