Maharashtra Weather News : राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी पावसामुळं जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे. दरम्यान, पहिल्याच मुसळधार पावसात कल्याण डोंबिवलीची (kalyan dombivali) दाणादाण उडाली आहे. अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले आहेत. तसेच कल्याण पूर्व येथील पिसवली गावातील 200 ते 250 घरांमध्ये पाणी शिरल्याची घटना देखील घडली आहे. 


कल्याण डोंबिवलीतील रस्ते जलमय 


आज सकाळपासूनच कल्याण डोंबिवलीत पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन तासांपासून कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. या पावसामुळं कल्याण डोंबिवलीतील रस्ते जलमय झाल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे कल्याण पूर्वेकडील पिसवली गावातील दोनशे ते अडीचशे घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. या गावातील नाल्याचा प्रवाह संबंधित विकासकामे बदलल्याने ही परिस्थिती उद्भवल्याची माहिती स्थानिकांनी सांगितली आहे. महापालिका प्रशासनाकडे याबाबत अनेकदा तक्रारी देखील करण्यात आल्या आहेत. मात्र, महापालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. 


पावसाचे पाणी घरात शिरल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल


पावसाचे पाणी घरात शिरल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. नागरिकांच्या वस्तूंचे नुकसान झालं आहे. सध्या महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. 


भिवंडीत मुसळधार पाऊस, स्व. राजीव गांधी उड्डाणपुलावर साचलं पाणी


भिवंडी शहरात रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने स्व.राजीव गांधी उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या उड्डाणपुलावर कोणत्याही प्रकारची साफसफाई न केल्यामुळं या उड्डाणपुलावर पाणी साचलं होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा उड्डाणपूल धोकादायक असल्याचे सांगितले गेले आहे. मागील पाच ते सहा वर्षांपासून हा उड्डाणपूल जड वाहनांसाठी बंदी घालण्यात आली आहे. अशा अवस्थेत या उड्डाणपुलावर पाणी किंचितही साचू नये यासाठी सूचनाही करण्यात आल्या आहेत. मात्र, असं असताना देखील या उड्डाणपुलावर भरमसाठ पाणी साचत असल्यानं महानगरपालिकेचे या उड्डाणपुलाकडे दुर्लक्ष होत आहे. 2006 मध्ये हा उड्डान पूल 22 कोटी रुपये खर्च करुन बनवण्यात आला होता. मात्र, त्यानंतर देखील वर्षानुवर्षे लाखो रुपये या उड्डाण पुलाच्या दुरुस्तीसाठी खर्च करण्यात येतात. मात्र तरी देखील या उडानपूलाचा एक भाग 2018 मध्ये कोसळल्याने एकच खळबळ उडाली होती.  व्हिजिटीआयच्या रिपोर्टनुसार राजीव गांधी उड्डाण पूल कमकुवत व धोखादायक असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे या उडान पुलावर पाणी साचू नये अशी सूचना देण्यात आली होती. त्यानंतर या उडान पुलाची  दुरुस्ती करून अवजड वाहतूक बंद करण्यात आली.


उड्डान पुलाची कोणतीही निगा न राखल्यामुळं या उड्डान पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी


या उड्डान पुलावर पाणी साचू नये, यासाठी विशेष लक्ष महानगरपालिकेने द्यायला हवं. परंतू, या उड्डान पुलाची कोणतीही निगा न राखल्यामुळं या उड्डान पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. त्यामुळं भविष्यात एखादी मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं महानगरपालिकेनं या उड्डान पुलावर वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.


महत्वाच्या बातम्या:


मुंबईत काळ्याकुट्ट ढगांची गर्दी, पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट