Akola Rain : राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. अकोला (Akola) जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं शहरातील अनेक भागात पाणी शिरलं आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले आहेत. शहरातील मोठी उमरी भागात उमरी ते गुडधी रस्त्यावरील विठ्ठलनगर येथे रस्त्याला अक्षरश: नदीचं रूप आलं आहे. तसेच  विठ्ठलनगर भागातील अनेक नागरिकांच्या घरातही पाणी शिरलं आहे. दरम्यान, सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. 


वाहतुकीची कोंडी


अकोला जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं काही रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. याचा वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. अनेक वाहनधारकांना रस्त्यावरुन वाहने काढताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. रात्री अनेकांची वाहने पाण्यामुळ रस्त्यातच बंद पडल्यानं अडकून पडली होती. अनेक ठिकाणी यामुळं वाहतुकीची कोंडी झाली होती. याच परिसरात अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं घरातील साहित्य तसेच इतर वस्तूंचं मोठं नुकसान झालं आहे. गोरेगाव बुजरुक गावातील बंशा नाल्याला पूर आल्याने गावाचा जिल्हा मुख्यालयासोबतचा संपर्क तुटलाय. अकोला शहराला पाणीपुरवठा करणारा महान येथील काटेपुर्णा प्रकल्प 100 टक्के भरला आहे. धरणाचे 10 पैकी सहा दरवाजे प्रत्येकी 30 सेंटीमीटरने उघडले आहेत. नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा जिल्हा प्रशासनानं इशारा दिला आहे. सध्या पाऊस बंद आहे. उमरी परिसरातील विठ्ठलनगर परिसरातील पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे.




राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी


राज्याच्या विविध भागात पाऊस कोसळत आहे. त्यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही ठिकाणी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. धरणांच्या पाण्यासाठ्यात देखील वाढ झाली आहे. त्यामुळं धरणांमधून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान आज विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, जालना, औरंगाबाद, लातूर बीड या जिल्ह्यातही यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच अहमदनगर, जळगाव जिल्ह्याला देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. 


हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार 14 सप्टेंबरपर्यंत अपेक्षित असलेला महाराष्ट्रातील पावसाचा जोर वाढीव तीन दिवस म्हणजे 15, 16 आणि 17 सप्टेंबरपर्यंत व्यापक वातावरणीय प्रणालीमुळं टिकून राहिला. परंतू यापुढे आजपासून (18 सप्टेंबर) राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मात्र, आजही विदर्भात पावासाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं तिथे जोरदार पावसाची शक्यता आहे.  


महत्वाच्या बातम्या: