Deepak Kesarkar in Kolhapur : शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अचानक कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुका कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ, कागल संचलित प्राथमिक विद्यामंदिर (औद्योगिक वसाहत) गोकुळ शिरगांव या पहिली ते पाचवीच्या विनाअनुदानित शाळेस भेट दिली. यावेळी दीपक केसरकर यांनी शाळेची पाहणी करुन विद्यार्थ्यांशी हितगुज करताना विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारत त्यांच्या अभ्यास पध्दतीचे निरीक्षण केले. यावेळी प्रत्येक वर्गात केसरकर यांनी मुलांना वही आवडते की पुस्तक? असे प्रश्न विचारत होते. यावर बहुतांशी विद्यार्थी विद्यार्थ्यांनी पुस्तकच आवडते असल्याचे उत्तर दिले. पुस्तकातील धड्याच्या शेवटी, जर तुम्हाला अभ्यासासाठी रिकामी जागा उपलब्ध करुन दिली तर चालेल का? असा प्रश्न करत त्यांनी विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याबाबतचे संकेत आपल्या कृतीतून दिले.


केसरकरांची अचानक भेट 


केसरकर यांच्या या अचानक दौऱ्याने चांगलीच तारांबळ उडाली. ज्या भागात कधीही मंत्र्यांचा ताफा आला नव्हता, अशा आडवळणी असणाऱ्या टोकाच्या भागात मंत्र्यांचा ताफा पाहून लोकांचे कुतूहल जागे झाले. शिक्षण मंत्र्यांच्या आगमनाची बातमी समजताच संस्था अध्यक्ष अतुल जोशी व विश्वस्त अमेय जोशी यांनी शाळेकडे धाव घेतली. त्यांनी संस्थेच्या वतीने केसरकर यांच्यासह शिक्षण उपसंचालक महेश चोथे, सहाय्यक शिक्षण संचालक सुभाष चौगुले, शिक्षण उपनिरीक्षक रविंद्र चौगले, वेतन पथकाच्या अधिकारी श्रीमती वसुंधरा कदम, प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद चे अधिक्षक सरनाईक, उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे यांचे श्री. अतुल जोशी यांनी पुष्पहार व शाल देवून स्वागत केले.


कामगारांच्या मुलांसाठी संस्था मोफत शिक्षण व शैक्षणिक सुविधा देते. तसेच गेली 16 वर्षे विनाअनुदानित तत्वावर ही संस्था सक्षमपणे कार्यरत असल्याबद्दल केसरकर यांनी संस्थेचे अध्यक्ष अतुल जोशी यांचे कौतुक केले. तसेच शाळेतील शिक्षकांबरोबर बंद खोलीमध्ये चर्चा केली व शिक्षकांना मार्गदर्शन केले. 


मी तुमच्यातलाच एक आहे मोकळेपणाने बोला व आपल्या सूचना असतील, तर सांगा असेही मंत्री केसरकर यांनी सांगत संवाद साधला. मी खरे बोलणारा माणूस आहे असे स्पष्ट करत अघोषित शाळांबाबत शासन लवकरच रचनात्मक निर्णय घेईल असेही सूचित करत शिक्षकांना दिलासा दिला. याबद्दल जोशी यांनी शिक्षण मंत्र्यांना धन्यवाद दिले. यावेळी कणेरीवाडीचे उपसरपंच अजित मोरे यांनी गावच्या वतीने शिक्षण मंत्री केसरकर यांचे पुष्पहार घालून स्वागत केले.