मुंबई : एप्रिल महिन्यात उष्णतेचे सर्व विक्रम मोडीत निघताना दिसत आहे. अनेक ठिकाणी तापमानाच्या पारा 46 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील चार दिवस उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. यासोबतच यंदाचा एप्रिल महिना देशातील उकाड्याचे सर्व विक्रम मोडण्याच्या मार्गावर आहे. भारतातील आतापर्यंतचा सर्वात उष्ण एप्रिल होण्याच्या मार्गावर आहे. साधारणपणे मे महिन्याच्या मध्यानंतर जेवढं तापमान असतं तेवढं तापमान एप्रिल महिन्यात वाढलं आहे.
देशातील बहुतांश भागांना उष्णतेचा तडाखा बसला आहे. 2 मे पर्यंत पूर्व, मध्य आणि वायव्य भारतात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड, राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भ, पश्चिम बंगाल, ओदिशा, छत्तीसगड आणि गुजरातमध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट राहिल. हवामान विभागाने पश्चिम राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेबाबत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. उर्वरित वायव्य भारत आणि मध्य भारतासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बहुतांश ठिकाणी पारा 45 अंश सेल्सिअसच्या पार
देशातील बहुतांश भागात तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलं आहे. उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये गुरुवारी (28 एप्रिल) कमाल तापमान 46.5 अंश सेल्सिअस होते. हरियाणातील हिस्सार, पंजाबमधील पटियाला इथे 46 आणि उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये 45.9 अंश सेल्सिअस तापमान होते. दिल्ली-एनसीआरमध्ये पारा 46 च्या जवळ राहिला. दिल्लीतील कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेजमध्ये पारा 46 वर पोहोचला. मुंगेशपूरमध्ये 45.8 अंश सेल्सिअस आणि गुरुग्राममध्ये 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
मुंबईची अवस्थाही बिकट
उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांमुळे मुंबईचं वातावरण आणखीच बिकट झालं आहे. एकीकडे मुंबईकर घामाने डबडबले आहेत तर दुसरीकडे पशु-पक्ष्यांचीही अवस्था दयनीय आहे. मुंबईत गुरुवारी (28 एप्रिल) सलग दुसऱ्या दिवशीही पारा 37 अंश सेल्सिअस एवढा राहिला. पुढील काही दिवस मुंबईत पारा 37 किंवा त्याहून अधिक राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उकाड्यापासून दिलासा मिळेल, अशी शक्यता फारच कमी आहे.
दिवसा तापमान 2 अंशांनी वाढण्याचा अंदाज
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये तापमानात 2 अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. तसंच पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये दिवसाचे तापमान दोन अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.