Anil Deshmukh : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या जामीन अर्जावर आजपासून सीबीआय (CBI) कोर्टात सुनावणी होणार आहे. सीबीआयच्या गुन्ह्यावरुन ईडीनं (ED) दाखल केलेल्या गुन्ह्यात हायकोर्टान देशमुखांना जामीन मंजूर केला आहे. तसेच याविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या ईडीला कोणताही दिलासा न देता सर्वोच्च न्यायालयानं त्यांचं अपील फेटाळून लावलं आहे. त्यामुळं देशमुखांनी सीबीआयच्या प्रकरणातही जामीन मागत कोर्टात याचिका दाखल केली आहे. यावरील सुणावणीला आजपासून सुरुवात होणार आहे.


दरम्यान, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 1 नोव्हेंबर पर्यंत वाढ करण्याचा निर्णय मुंबई सत्र न्यायालयाने दिला होता. या प्रकरणात अनिल देशमुख यांच्यासह कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे या आरोपींच्याही न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयने अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरु आहे.


नोव्हेंबर 2021 मध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणात झाली होती अटक


अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जामीन अर्जाला विरोध करत सीबीआयने शुक्रवारी (15 ऑक्टोबर) आपला जबाब नोंदवला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते देशमुख यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. सध्या ते आर्थर रोड तुरुंगात आहेत. गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात देशमुखांना जामीन मंजूर केला होता. त्यानंतर त्यांनी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जामिनासाठी विशेष सीबीआय न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करणार नसल्याचं सांगत अनिल देशमुख यांना मोठा दिलासा दिला आहे. 


तरीही अनिल देशमुख  तुरुंगात


ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये अनिल देशमुख यांना जरी जामीन मिळाला असला तरी त्यांच्यावर सीबीआयनेही आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात त्यांना अद्याप जामीन मिळाला नसल्याने त्यांना कोठडीतच राहावं लागणार आहे.  


नेमकं प्रकरण काय?


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी त्यावेळचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणी सीबीआयनं प्राथमिक चौकशीनंतर अनिल देशमुखांसह अन्य काहीजणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. आता या प्रकरणाची सुनावणी मुंबई सत्र न्यायालयात सुरु आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Anil Deshmukh : अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 1 नोव्हेंबरपर्यंत वाढ, मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय