नाशिक : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नाशिकमध्ये काल केलेली दोन वक्तव्य सध्या राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चेचा विषय ठरत आहेत. पहिलं म्हणजे 'राजकारणात नाईलास्तव काही गोष्टी कराव्या लागतात' आणि दुसरे म्हणजे 'अजितदादांकडे काही आग्रहपूर्वक मागणी करायला गेलो की दादा म्हणतात चला रे राजेशचा जरा कोरोनाचा खर्च कमी करून टाकू'.


राजेश टोपे हे मंगळवारी दुपारी नाशिक दौऱ्यावर आले होते. राष्ट्रवादी कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतल्यानंतर महात्मानगरला एका लसीकरण केंद्राला त्यांनी भेट देत के के वाघ महाविद्यालयात हजेरी लावली होती. के के वाघ संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांचे 90 व्या वर्षात पदार्पण होत असल्याने टोपे त्यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार इथे करण्यात आला. तसेच आरोग्यमंत्री म्हणून कोरोना काळात करत असलेल्या उल्लेखनीय कामाबाबत राजेश टोपे यांचाही सत्कार संस्थेतर्फे पार पडला. 


सत्कार सोहळा पार पडल्यानंतर टोपे हे भाषणाला उभे राहताच त्यांनी बाळासाहेब वाघ यांच्या सामाजिक तसेच शैक्षणिक कार्याबाबत कौतुक तर केले. मात्र यावेळी त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या होत्या. टोपे म्हणाले की मी आत्ता भाऊं शेजारी (बाळासाहेब वाघांशेजारी) बसलो होतो तेव्हा त्यांना विचारले की राजकारणात तुम्ही का नाही आलात? तेव्हा त्यांनी मला इच्छा नसल्याचं सांगताच 'राजकारणात नाईलास्तव काही गोष्टी कराव्या लागतात, जे तुम्हाला जमले नसते त्यामुळे तुम्ही या पासून दूर राहिलात तेच चांगले केले' असे मी त्यांना सांगितल्याचे वक्तव्य केलं. 


विशेष म्हणजे हा कार्यक्रम आटोपताच पत्रकारांनी त्यांना 'त्या नाईलाजास्तव गोष्टी कोणत्या ?' असा प्रश्न विचारताच 'एव्हरिथिंग ईज फेअर इन लव्ह अँड राजकारण' असे राजकारणात दुर्दैवाने झाले आहे, वास्तविक राजकारणी खूप आदर्श असावा असे आमचे व्यक्तिगत मत आहे. काही काही काळानुरूप गोष्टी घडतात. त्या भाऊंसारख्या (बाळासाहेब वाघांसारख्या) वयाच्या लोकांना जमणार नाही असं उत्तर दिल्याने राजेश टोपे यांचा नक्की नेम कोणाकडे? राजकारणातील अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्या भाऊंसारख्या वयाच्या लोकांना जमणार नाहीत ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.   
     
दरम्यान याच कार्यक्रमात टोपे यांनी बोलतांना वाघ यांनी मागणी केल्याप्रमाणे महाविद्यालयाच्या स्कॉलरशिप प्रश्नाबाबत अजित दादांशी मी लवकरच बोलतो असं स्पष्ट करत असतांनाच 'अजित दादांकडे मी काही आग्रहपूर्वक असं बोलायला गेलो की दादा म्हणतात, चला रे राजेशचा जरा कोरोनाचा खर्च कमी करून टाकू त्यामुळे मला थांबावं लागतं' पण मी प्रयत्न करतो. असं वक्तव्य केलं. मात्र यानंतर त्यांचे समोर लागलेल्या मीडियाच्या कॅमेराकडे लक्ष गेले आणि हा चेष्टेचा विषय झाला पण दादा, पवार साहेब, मुख्यमंत्री सर्वच या कामात मदत करतील तुम्ही चिंता करू नका असं म्हणत विषय आवरता घेत संस्थेला जी काही मदत लागेल ती मी करेल, महाराष्ट्रात लसीकरणाचा वेग अजून वाढवणं गरजेचं असून नागरिकांनी देखील ही मोहीम वाढविण्यासाठी प्रयत्न करा असं म्हणत सगळ्यांचा कार्यक्रमातून निरोप घेतला.