मुंबई: दिशा सॅलियन मृत्यूप्रकरणात आक्षेपार्ह विधान केल्यामुळे दाखल झालेला रद्द करण्यासाठी राणे पिता पुत्रांनी दाखल केलेल्या याचिकेवर येत्या मंगळवारी हायकोर्टात सुनावणी होणार आहे. दरम्यान, मुंबईच्या दिंडोशी सत्र न्यायालयानं राणेंना दिलेला दिलासा 15 मार्चपर्यंत कायम ठेवला आहे. या प्रकरणी नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीनाला राज्य सरकारच्या वतीनं जोरदार विरोध करण्यात आला आहे. राणे देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचं नाव घेत मुंबई पोलीस तसेच तपासावर दबाव टाकत असल्याचा आरोपही राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आला आहे. तसं प्रतिज्ञापत्रच मुंबई पोलीसांच्या वतीनं गुरूवारी दिंडोशी सत्र न्यायालयात सादर करण्यात आलं. राणे पिता पुत्रांनी मात्र आपल्याविरोधात दाखल हा गुन्हा निव्वळ राजकीय सूडबुद्धीनं दाखल करण्यात आल्याचा दावा केला आहे.
5 मार्च रोजी मालवणी पोलीस स्टेशनमध्ये 9 तास झालेल्या चौकशीदरम्यान, नारायण राणेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केल्यानंतर मुंबई पोलिसांनी आपल्याला सोडल्याचा दावा केला. मात्र हा दावा चुकीचा असून गृहमंत्र्यांचं नाव घेत राणे तपासावर प्रभाव पाडू पाहत असल्याचा दावा राज्य सरकारच्यावतीनं करण्यात आला. तसेच आपल्याकडे पुरावे असून ते इथं देणार नाहीत, असं त्यांनी पोलिसांना सांगितलं. ते प्रथमदर्शनी साक्षीदार नसतानाही त्यांना या प्रकरणाची माहिती कोणी दिली?, राणे हे लोकप्रतिनीधी असून ते आपल्या पदाचा आणि अधिकारांचा दुरुपयोग करून मृत्यूनंतर दिशाचं चरित्र्य हनन करणारे, खोटे आणि नराधार आरोप केल्यामुळे तिच्या कुटुंबियांना नाहक त्रासाला सामोरे जावं लागत असल्याचंही पोलिसांनी म्हटलेलं आहे. तसेच राणे पिता-पूत्र कोणतेही पुरावे नसताना खोटे आरोप करत असल्यामुळे त्यांना पोलीस कोठडी देण्यात यावी आणि त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावण्यात यावा, अशी मागणी पोलिसांच्यावतीने करण्यात आली आहे.
या प्रकरणातील चौकशीला उपस्थित राहत राणं पितापुत्रांनी त्यांच्याकडे दिशाबाबत पुरावे कोणाकडून प्राप्त केले? याबाबत कोणतीही माहिती दिलेली नसून केवळ उडवाउडवीची उत्तर दिली. त्यामुळे या दोघांच्या या प्रकरणाशी संबंध काय?, त्यांच्याकडे जर काही पुरावे आहेत तर ते कोणी दिले? याची चौकशी होणं गरजेचं आहे. दिशाच्या मृत्यूप्रकरणी तपास होत असताना त्यांच्याकडील पुरावे ताब्यात घेण्यासाठी त्यांची पोलीस कस्टडी आवश्यक असल्याचा दावा यात पोलिसांकडून करण्यात आला आहे. जर त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नसताना त्यांनी आरोप केले असतील, तर ते कोणत्या उद्देशाने केले होते?, त्याबाबतही माहिती दिलेली नाही असंही पोलिसांनी कोर्टाला सांगितलं.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतची व्यवस्थापक दिशा सॅलियननं मालवणी येथील आपल्या राहत्या घरी 9 जून 2020 रोजी आत्महत्या केली होती. दिशाच्या मृत्यूप्रकरणी आक्षेपार्ह व बदनामीकारक विधानं केल्याबद्दल मालवणी पोलीस ठाण्यात नारायण राणे आणि नितेश यांच्याविरोधात दिशाच्या आईनं दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर या दोघांना जबाब नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे समन्सही बजावण्यात आलं होतं. यानंतर राणे पितापुत्रांनी दिंडोशी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्जही केला आहे ज्यावर 15 मार्चलाच दिंडोशी सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha