आमदार रमेश कदम यांच्या स्वागतासाठी मोहोळमध्ये हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. तसेच त्यांच्यासाठी 500 किलो वजनाचा फुलांचा हारदेखील तयार करण्यात आला आहे. तीन ते सहा ऑक्टोबर पर्यंत उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.
रमेश कदम हे 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर मोहोळ विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र अण्णाभाऊ साठे आर्थिक मंडळ गैरव्यवहारप्रकरणी ते गेल्या 40 महिन्याहून अधिक काळ हे तुरुंगात आहे. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता यावा यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे जामीन अर्ज दाखल केला होता. हा अर्ज मंजूर करत मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने त्यांना तात्पुरत्या स्वरूपाचा जामीन मंजूर केला आहे.
जामीन मंजूर केल्यानंतर रमेश कदम हे पहिल्यांदाच मोहोळमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी 500 किलोचा हार आणला असून क्रेनद्वारे रमेश कदम यांना तो घालण्यात येणार आहे. हजारोंच्या संख्येने सकाळपासूनच कार्यकर्ते मोहोळमध्ये जमायला सुरुवात झाली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे बडतर्फ आमदार रमेश कदम यांना ईडी कोर्टाकडून याआधीच जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र त्यांच्याविरोधात स्टेट सीआयडीनं दाखल केलेलं प्रकरण प्रलंबित असल्याने कदम हे तुरुंगातच होते. त्यासाठी यांनी हायकोर्टात जामीनासाठी याचिका दाखल केली होती. अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यात रमेश कदम हे मुख्य आरोपी आहेत.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या अध्यक्षपदी असताना बोगस लाभार्थी दाखवून रमेश कदमांनी शेकडो कोटींचा घोटाळा केला आहे. याप्रकरणी रमेश कदमांसह एकूण 12 जणांना अटक केली आहे. याच घोटाळ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना पक्षातून निलंबित केलं आहे. डिसेंबर 2018 मध्ये कारागृहातील असभ्य वर्तन आणि संबंधित खटल्यातील साक्षीदारांचं संरक्षण या मुद्यांवर मुंबई उच्च न्यायालयानं आमदार रमेश कदम यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. मात्र याप्रकरणी पोलीस तपासांत जाणून बुजून दिरंगाई करत असल्याचा आरोप कदमांच्या वतीने करण्यात आला आहे.
दरम्याच्या, या ना त्या कारणानं रमेश कदम सतत चर्चेत राहिलेत. मागे एका व्हीडिओ क्लीपमध्ये कदम आर्थर रोड जेलमध्ये कर्तव्य बजावणा-या पोलिसांना शिवीगाळ करत असल्याचं दिसलं होतं, त्यासंदर्भात रमेश कदम यांच्याविरोधात नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. मात्र पोलिसांनीच मला जातीवाचक शिवीगाळ केली आणि २५ हजारांची लाच मागितली असा त्यांचा दावा होता. तसेच भायखळा जेलमध्ये असताना मंजुळा शेट्ये प्रकरणातही रमेश कदम यांनी पोलिसांवर आरोप केले होते. याशिवाय पोलीस बंदोबस्तात विधानभवनात आलेल्या कदमांनी जाहीरपणे भाजपला पाठींबा देत असल्याचं सांगितलं होतं.
व्हिडीओ पाहा