मुंबई : उमेदवारी अर्ज भरताना आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जणू भंडाराच उधळला होता. उमेदवारापासून कुटुंबीयांपर्यंत आणि नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सगळे पिवळे...


सोलापुरात प्रणिती शिंदेंनी पिवळा धम्मक चुडीदार परिधान केला होता आणि सोबत होता ढोल ताशा. योगायोग म्हणजे प्रणिती शिंदे यांचे प्रतिस्पर्धी दिलीप मानेही पिवळ्या रंगात रंगले होते आणि ते चक्क बुलेटवरुन दाखल झाले.

परळीत भाऊ-बहिण एकाच रंगात
परळीत पक्के वैरी असलेले सख्खे चुलत बहीण-भाऊ पिवळे जर्द झाले होते. पंकजा मुंडे यांनी नवरात्रीचा आजचा कलर फॉलो केला होता. तर धनंजय मुंडेंनीही पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता

कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवार धनगरी वेशभूषा
कर्जत-जामखेड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांनी थेट धनगरी वेशभूषा केली होती. विराट पदयात्रेला संबोधित करताना पिवळ्या कुर्त्यासह रोहित पवारांनी खांद्यावर घोंगडंही घेतलं होतं.

पुण्यातील उमेदवारही पिवळी धम्मक
लोकमान्य टिळक यांच्या वंशज आणि भाजप उमेदवार मुक्ता टिळक यांनीही रॅलीमध्ये पिवळी धमक साडी परिधान केली होती. इतकंच काय कार्यकर्ते तर आधीच पिवळे धम्मक झाले होते

भुजबळांचाही यलो डे
खरंतर नवरात्रीतले रंग फॉलो करण्याचा ट्रेन्ड महिलांमध्ये जास्त असतो. पण यंदा पुरुषही मागे नाहीत. नाशिकमध्ये छगन भुजबळ यांनी पारंपरिक पांढरा रंग सोडून पिवळ्याला आपलंसं केलं. बाकी मफलर मात्र भुजबळांनी सोडला नाही. तर शिवसेनेच्या निर्मला गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना पिवळी साडी नेसली होती.

आदित्य ठाकरेंच्या मातोश्रीही पिवळ्या रंगात
इकडे मुंबईतही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आदित्य ठाकरे पिवळ्या कपड्यांमध्ये येतील असं वाटलं होतं. पण ही कसर त्यांच्या मातोश्रींनी भरुन काढली. पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेल्या रश्मी ठाकरे आदित्य यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित होत्या आणि शिवाय कार्यकर्ते होतेच. तर आशिष शेलार यांच्या पत्नीनेही पिवळ्या रंगाची साडी नेसली होती.

पिवळा रंग हा लक्ष्मीचा आवडता रंग असं म्हणतात. आता मतांच्या रुपाने मिळणारी लक्ष्मी कुणाला पावते ते 24 ऑक्टोबर रोजी पाहूया.