बीड : मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणावरून, भाजप नेत्या पंकजा मुंडे या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी जाहीर भाषणामधून जोपर्यंत मराठा आणि ओबीसी समाजाच्या, आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही. तोपर्यंत हारतुरे आणि फेटा स्वीकारणार नाही. असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. बीडमध्ये आयोजित एका अभिनव कार्यशाळेत त्या बोलत होत्या.
पंकजा मुंडे बोलताना म्हणाल्या की, "मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत बीड जिल्ह्यानं नवा आदर्श घालून दिला पाहिजे. मी सांगते आजपासून कोणीही मला हार घालणार नाही. मी मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही, तोपर्यंत हारतुरे स्विकारणार नाही. त्यासोबतच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निकाली लागत नाही. तोपर्यंत फेटा बांधनार नाही. समाज बंधावांनी मराठा-ओबीसी वाद लावणारांपासून सावधान होणं गरजेचं आहे. तसेच छत्रपती शिवरायांचा सामाजिक अभिसरणाचा आदर्श घेण्याची गरज आहे." आज बीड शहरामध्ये जिल्ह्यातील राजपूर बूथ कार्यकर्त्यांकडून वर्कशॉप आयोजित करण्यात आलं होतं, या ठिकाणी पंकजा मुंडे बोलत होत्या.
दरम्यान, भाजपाच्या नवनिर्वाचित मंत्र्यांच्या महा जन आशीर्वाद यात्रेला काल (सोमवारी) सुरुवात झाली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या यात्रेची सुरुवात ही गोपीनाथ गडावरून झाली. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे दर्शन घेऊन यात्रा सुरु करत असतानाच पंकजा मुंडे यांनी मात्र कार्यकर्त्यांना चांगलंच झापलं.
काल (सोमवारी) सकाळपासूनच पंकजा मुंडे यांच्या घराबाहेर जमणारे कार्यकर्तेसुद्धा मुंडे साहेब अमर रहे यासोबतच पंकजा मुंडे अंगार है बाकी सब भंगार है, अशा घोषणा देत होते गोपीनाथ गडावर ती सुद्धा अशा प्रकारच्या ज्या वेळेस घोषणा चालू होत्या. त्यावेळी पंकजा मुंडे कार्यकर्त्यावर चांगल्या संतापल्या यावेळी पंकजा मुंडे यांनी अशा घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगलेच धारेवर धरले.
हा आपला कार्यक्रम आहे. याठिकाणी फक्त मुंडे साहेब अमर रहे, अशा घोषणा द्या. इतर कोणत्या घोषणा दिल्या तर याद राखा, असा दम सुद्धा यावेळी पंकजा मुंडे यांनी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना भरला.