मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार, नेते काही ना काही कारणांनी वर्षा वर फेऱ्या मारत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर याची चर्चा अधिक होत आहे. यातच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काल वर्षा बंगल्यावर सीएम देवेंद्र फडवणीस यांची भेट घेतली.

हर्षवर्धन पाटील यांनी लिहिलेल्या 'विधानगाथा' पुस्तक प्रकाशन सोहळा निमंत्रण देण्यासाठी पाटील परिवारासमवेत मुख्यमंत्र्यांना भेटले. हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता जिल्हा परिषद सदस्य झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.

एकीकडे इंदापूर विधानसभा मतदार संघ जागा काँग्रेस की राष्ट्रवादीला जाणार याबाबत अजून ही चित्र अस्पष्ट आहे.  दत्ता भरणे की हर्षवर्धन पाटील यावरून आघाडीत राजकीय कलह आहे. त्यातच पाटील यांचा मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियात आल्यामुळे दबावाचे राजकारण खेळले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची  हर्षवर्धन पाटील व राजवर्धन पाटील यांच्यासमवेत भेट घेऊन  हर्षवर्धनजी पाटील साहेब लिखित “विधानगाथा” या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रित केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लगेच हे निमंत्रण स्वीकारले व संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आल्याबद्दल माझे अभिनंदन केले, असे अंकिता पाटील यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.