त्यानुसार एसटी प्रशासनाने मुंबई, ठाणे, पुणे, येथून नियमित बसेस व्यतिरिक्त दररोज 180 जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. तसेच मुंबई-पुणे मार्गावर शिवनेरीच्या जादा 24 फेऱ्या सुरु करण्यात येत आहेत.
मध्य रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी मुंबई, पुणे, मिरज, सांगली, कोल्हापूर या मार्गावरील विविध रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. या मार्गावर दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीने मुंबई विभागातून 50, ठाणे विभागातून 50, पुणे विभागातून 70, आणि मिरज, सांगली आणि कोल्हापूर विभागातून 10 अशा 180 जादा बसेस दररोज सोडण्याचे नियोजन केले आहे. उपरोक्त बसस्थानकात जादा बसेसचे नियोजन करण्यासाठी समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या व्यतिरिक्त प्रवासी मागणीनुसार त्या-त्या बसस्थानकावरून विशेष बसेस सोडण्यात येतील. असही एसटी प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक 15 दिवस बंद राहणार, 'या' गाड्या रद्द
पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक पंधरा दिवस काही काळासाठी बंद राहणार आहे. मध्य रेल्वेवर 26 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान मोठी तांत्रिक दुरुस्ती आणि इतर काम हाती घेण्यात येणार असल्याने वाहतूक बंद राहिल. परिणामी पुण्याहून मुंबईला येणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेस आणि प्रगती एक्स्प्रेस या गाड्या बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसंच इतर 13 गाड्या पुण्यापर्यंत आणि पुण्यापासून पुढे धावणार आहेत.
मुंबई-पुणे मार्गावरील एसई लाईन म्हणजे, खंडाळा घाटात हे अतिमहत्त्वाचे काम हाती घेतलं जाणार आहे. दुरुस्तीच्या काळात कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी खबरदारी म्हणून वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामाच्या कालावधीत काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
मुंबईहून सुटणाऱ्या कोयना, सह्याद्री, महालक्ष्मी एक्स्प्रेस पुण्याहून सुटणार आहेत. त्यामुळे या पंधरा दिवसांत प्रवाशांना मुंबईत येण्या-जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
एक्स्प्रेस गाड्यांचं बदलेलं वेळापत्रक
* कोयना, सह्याद्री, महालक्ष्मी या तिन्ही गाड्या पुण्याहून सुटणार
* कोल्हापूर-पुणे-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस रद्द
* पुणे-भुसावळ गाडी मनमाड मार्गे धावणार
* पुणे-पनवेल-पुणे शटल सेवा सुद्धा रद्द
* नांदेड-पनवेल ही गाडी पुण्यापर्यंतच धावणार. पुणे ते पनवेल मार्गावर धावणार नाही