petroleum refinery at Chandrapur and Konkan: चंद्रपुरात (Chandrapur News) 20 वीस मिलियन मॅट्रिक टन इतक्या क्षमतेची रिफायनरी उभारणार असल्याची घोषणा केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी केली. त्याचवेळी त्यांनी कोकणातील रिफायनरी रखडल्याबद्दल नाराजी देखील व्यक्त केली. पण पुरी यांच्या या घोषणेनंतर आता कोकणातल्या रिफायनरीचे भवितव्य काय? चंद्रपुरात रिफायनरी उभारली गेल्यास कोकणात रिफायनरी उभारणार की नाही? असा सवाल देखील आता विचारला जात आहे. मुख्य गोष्ट म्हणजे विदर्भात रिफायनरी व्हावी यासाठी यापूर्वी आमदार आशिष देशमुख यांनी प्रयत्न केले होते. शिवाय नितीन गडकरी यांनी तत्कालीन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र देखील लिहिल्याचे बोलले जात होतं. त्यामुळे पुरी यांच्या विधानानंतर कोकणातल्या रिफायनरीबाबत चर्चा सुरू झाल्यास नवल वाटायला नको. कोकणातल्या नाणार येथील रिफायनरी रद्द झाल्यानंतर राजापूर तालुक्यातीलच बारसू आणि सोलगाव इथं ही रिफायनरी प्रस्तावित आहे. पण विरोधामुळे अद्याप या ठिकाणी ड्रोन सर्वेक्षण आणि माती परीक्षण पूर्ण झालेलं नाही. यानंतर नाराज असलेल्या आरआरपीसीएल कंपनीने राज्य सरकारला महिन्याभराचा अल्टिमेटम दिलेला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार या महिन्याभरात किमान आम्हाला माती परीक्षण आणि ड्रोन सर्वेक्षण पूर्ण करू द्यावे. प्राथमिक स्तरावरीलच काम लांबत असल्यामुळे रिफायनरी प्रत्यक्ष उभारण्यास किती अवधी लागेल? याचा देखील गांभीर्यपूर्ण विचार होणं गरजेचा आहे.
कोकणात 60 मिलियन मेट्रिक टन रिफायनरी शक्य?
चंद्रपुरात 20 मिलियन मेट्रिक टन इतक्या क्षमतेची रिफायनरी उभारली जात आहे. पण त्याच वेळेला आता कोकणात 60 मिलियन मेट्रिक टन क्षमतेची रिफायनरी उभारणं शक्य आहे असं सांगितलं जात आहे. आणि त्याचे उत्तर म्हणजे नाणार. नाणार या ठिकाणची रिफायनरी रद्द झालेली असली तरी या ठिकाणी उपलब्ध असलेली जागा आणि पूर्वी प्रस्तावित असलेल्या रिफायनरीची क्षमता ही 60 मिलियन मेट्रिक टन इतकी होती. पण त्याच वेळेला बारसू आणि सोलगाव या ठिकाणी उभारली जाणारी रिफायनरी ही 20 मिलियन मॅट्रिक टन इतक्या क्षमतेची आहे. त्यामुळे रिफायनरीची क्षमता कमी करून कोकणाच्या आर्थिक विकासामध्ये बाधा नको. नाणार येते मुबलक प्रमाणात जागा उपलब्ध होत असल्यास त्या ठिकाणी पूर्ण क्षमतेची अर्थात 60 मिलियन मॅट्रिक टन क्षमतेची रिफायनरी उभी करावी असा देखील एक सूर अद्यापही नाणार या ठिकाणाला पाठिंबा देणाऱ्या समर्थकांचा आहे.
विभाजन करून रिफायनरीची उभारणी?
यापूर्वी एकाच ठिकाणी मोठ्या क्षमतेची रिफायनरी उभारणं अशक्य झाल्यास तिचं विभाजन व्हावं. अर्थात दोन ते तीन टप्प्यांमध्ये रिफायनरी उभारावी किंवा उभारली जाईल अशी चर्चा देखील रंगली होती. तसेच नवी दिल्ली इथं काही दिवसांपूर्वी बोलताना महाराष्ट्र किंवा रत्नागिरीच नव्हे तर देशातल्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी भागाचा विचार केल्यास या ठिकाणच्या कोणत्याही भागात रिफायनरी उभारली जाईल असं केंद्रीय मंत्र्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे एकंदरीत सारासार विचार करता कोकणातील रिफायनरीची क्षमता कमी असली तरी दोन ते तीन ठिकाणी विभागून रिफायनरी उभारली जाऊ शकते का? तसा विचार सरकार दरबारी संबंधित कंपन्यांमध्ये आहे का? यावर देखील पुरी यांच्या या विधानाने चर्चा होऊ शकते.
कंपनी नाराज; चर्चा सुरू
सौदी अरेबियातील मोठी कंपनी आणि देशातल्या रिफायनरीमध्ये जास्त प्रमाणात गुंतवणूक कंपनी करणारी म्हणजे आरामको. पण रिफायनरी उभारण्यास किंवा कोकणात रिफायनरची जागा निश्चिती होण्यास विलंब होत असल्याने संबंधित कंपनी नाराज आहे. त्यामुळे आता सदरची कंपनी आणि केंद्र सरकार यांच्यात बोलणं सुरू असल्याची माहिती यापूर्वीच 'एबीपी माझा'ला सूत्रांनी दिलेली आहे. या साऱ्या घडामोडींमध्ये आता राज्य सरकारची भूमिका देखील महत्त्वाची असणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
चंद्रपूरसाठी केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा; मोठ्या क्षमतेची पेट्रोलियम रिफायनरी स्थापन करणार