मुंबई : रमजान.... मुस्लिम समाजाचा पवित्र महिना. पण यावर्षी कोरोनाचे सावट आहे. तेव्हा मुस्लिम बांधवांनी हा पवित्र महिना घरी बसून साजरा करावा असं आवाहन मुस्लिम अभ्यासक नौशाद उस्मान यांनी केले आहे. यासाठी कुराण शरीफातील दाखला ही त्यांनी दिला. त्यात तुम्ही एका जीवाच्या मृत्यूस ही कारणीभूत ठरला तर तुम्ही मानवतेचा जीव घेतल्याचं पाप तुमच्या माथी लागेल, असं अल्लाहने नमूद केल्याचं ते सांगतात.


इतिहासात डोकावताना त्यांनी कोरोनाच्या महामारीशी निगडित प्रसंगही सांगितला. अशा आपत्तीत रोजा इफ्तार आणि रात्रीची नमाज अर्थात तरावीह घरातच अदा केली जायची. कारण भूतलावर जिवापेक्षा काहीच महत्वाचं नसल्याचं अल्लाहने म्हटलंय असं ही जाणकारांनी सांगितले. अगदी नमाज अदा करताना साप-विंचू समोर आला तरी नमाज बाजूला ठेवून आधी जीव वाचवावा अन मगच नमाज अदा करावी. इतकं महत्त्व जीवाला असल्याने कोरोनाच्या महामारीत रमजान घरीच साजरा करा असं आवाहन करण्यात आलं आहे.


तसेच उपवास म्हणजेच रोजा पकडल्यानंतर पहाटे पाच ते सायंकाळी सात म्हणजे चौदा तास उपाशी पोटी रहावं लागतं. अशात प्रतिकारशक्ती कमी होण्याची शक्यताही असते. त्यामुळं ज्यांना प्रतिकार शक्ती कमी होण्याची भीती आहे त्यांनी रोजा न करता इफ्तारमध्ये सामील व्हावं. त्यांना रोजा केल्याचं पुण्य मिळेल. प्रतिकारशक्ती कमी होण्याकडे कानाडोळा केल्यास कोरोना त्यांच्यावर हावी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. "जान है तो जहान है" या उक्ती प्रमाणेच सध्या जीवाची पर्वा करा, तरच आपण भविष्यातील रमजान सोबतीने साजरे करू, असेही नौशाद उस्मान म्हणाले.


घरातच नमाज पठण करा


रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधवांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घरातच नमाज पठण करावं , घराच्या छतावर , गच्चीवर नमाज पठण करू नये. तसेच रमजानचा उपवास सोडण्यासाठी विविध फळं,अन्न पदार्थ खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी करू नये, सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे , सरकारच्या आदेशाचे, प्रशासनाच्या आदेशाचे पालन करावे असं आवाहन धुळ्यातील मुस्लिम धर्माचे धर्मगुरु मुफ्ती कासीम जिलानी यांनी मुस्लिम बांधवांना केलं आहे.


 घरीच रमजान साजरा करा


इस्लाम धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्याची सुरुवात होत आहे. चंद्रदर्शनानंतर रमजान महिन्याची सुरुवात झाली. त्यामुळे उद्या रमजानचा पहिला उपवास अर्थात रोजा असणार आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजानच्या कालावधीत खबरदारी बाळगण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. रमजानमध्ये दैनंदिन प्रार्थना, इफ्तार तसेच तरावीहसाठी मुस्लिम बांधव एकत्रित येत असतात. मात्र कोरोनाचा धोका टाळण्यासाठी मुस्लिम बांधवांनी एकत्रित न येता घरीच रमजान साजरा करावा अशी सूचना प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे.


नाशिकमध्ये घरपोच फळे


नाशिक जिल्ह्यातील मालेगावात कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. विशेष म्हणजे मालेगावात मुस्लिम बांधवांची संख्याही अधिक असल्याने रमजान घरात बसूनच साजरा करा असे आवाहन कृषी मंत्री दादा भुसे यांनी मालेगावकरांना केले आहे. रमजानच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून फळे किंवा इतर आवश्यक वस्तू घरपोच उपलब्ध करून दिली जाणार असल्याचंही त्यांनी म्हंटलय.