शिर्डी : साईनामाचा जयघोष... रस्त्यांवर भाविकांची गर्दी आणि भक्तांनी भरलेल्या दर्शन रांगा हे चित्र शिर्डीत नेहमीच समोर येतं. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंदिरं बंद केली आणि भक्तांनी फुललेली शिर्डी आता निर्मनुष्य झालीय. दरवर्षी गुरुपौर्णिमा म्हंटल की दिसणार चित्र आता बदललं असून याचा परिणाम साई संस्थानच्या दानावर झालाच आहे तर स्थानिक ग्रामस्थ व शिर्डीच अर्थकारण ठप्प झालंय.


देशभरातील भाविकांच श्रद्धास्थान व देशातील दुसऱ्या क्रमांकाच श्रीमंत देवस्थान म्हणून साईबाबांच्या शिर्डीची ओळख आहे. दररोज 30 ते 40 हजार तर उत्सव काळात 2 लाखाहून अधिक भाविक शिर्डीत हजेरी लावत. मात्र, गेल्या वर्षी मार्च महिन्यात देशात कोरोनाचा शिरकाव झाला आणि सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली. ही परिस्थिती सुधारेल या आशेत पहिल्या लाटेत 8 महिने साई मंदिर बंद होते. त्यानंतर मागील वर्षी 16 नोव्हेंबरला मंदिर सुरू झालं आणि आता आपली अर्थव्यवस्था सुरळीत होईल या आशेवर शिर्डीकर असताना पुन्हा दुसरी लाट आली आणि यावर्षी 5 एप्रिलपासून पुन्हा धार्मिक स्थळे बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आणि शिर्डीचे अर्थकारण ठप्प झाले.


शिर्डीच्या साईबाबा मंदिरावर शिर्डीच पूर्ण अर्थकारण अवलंबून असून मंदिर बंद झाल्याने कोट्यवधींची उलाढाल असलेल्या शिर्डीच्या अर्थकारणावर मोठा परिणाम झाला आहे. फुल व प्रसाद विक्रेते, रेस्टॉरंट चालक, हॉटेल मालक यासह ट्रॅव्हल्स फेरीवाले यांच्यावर मोठं आर्थिक संकट कोसळल असून आज सरकारच्या मदतीची वाट पाहण्याशिवाय पर्याय उरला नाही. शिर्डीत फुलं व प्रसाद विक्रेत्यांच्या दुकानाची संख्या 500 ते 600 असून मागील वर्षी पासून दुकाने ठप्प असल्यानं वार्षिक 200 कोटींची उलाढाल थांबली असल्याची माहिती प्रसाद विक्रेते रवी गोंदकर यांनी दिलीय.


शिर्डीत येणाऱ्या भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढणारी संख्या पाहता हॉटेल व रेस्टॉरंट चालकांची संख्या मोठी असून जवळपास 1100 हॉटेल व रेस्टॉरंट चालकांच्या अर्थकारण पूर्णपणे ठप्प झाले असून महिन्याला 500 कोटींची उलाढाल या व्यवसायात होत होती. मात्र, गेल्या वर्षभरात हा व्यवसाय पुर्णपणे ठप्प झाला असून पालिका कर आणि टॅक्स भरणे सुद्धा कठीण झाले असून आमच्या पुढे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही, असं मत शिर्डी हॉटेल असोसिएशनचे सचिव सुजित गोंदकर यांनी व्यक्त केलं.


एकीकडे शिर्डीच अर्थकारण ठप्प झाले असताना दुसरीकडे वर्षाकाठी 300 कोटीहून अधिक दान मिळणाऱ्या साईबाबा संस्थानच्या दानात मोठी घट झाली असून मागील वर्षात अवघे 92 कोटी दान ऑनलाइनच्या माध्यमातून जमा झाल आहे. राज्य सरकार धार्मिक स्थळे उघडून मदत करणार का हे आगामी काळात पाहणं महत्वाचं आहे.