मुंबई : अजितदादा हे राजकारणातील एक शिस्तशीर, वक्तशीर व्यक्तिमत्व. राजकीय व्यक्तीमध्ये अभावानेच आढळणारे हे गुण अजितदादांमध्ये आवर्जून आढळतात. त्यांनी एकदा कामाचा प्रारंभ केला तर मागे वळून पाहत नाहीत अशी स्तुतीसुमने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर शुभेच्छा पत्राच्या माध्यमातून उधळली आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस एकाच दिवशी येतो. अजित पवार हे आज 62 वर्षांचे झाले तर देवेंद्र फडणवीस 51 वर्षांचे झाले. त्यानिमित्ताने देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना एक पत्राच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. वेळेची आणि कामाची दोन्ही शिस्त अतिशय पक्की असल्याने दादा कर्तव्यकठोर व्यक्तिमत्व म्हणून अनेकांना भासतात आणि बोलायला लागले की त्यांच्यातली विनोदबुद्धी अनुभवास येते. म्हणूनच एक आगळेवेगळे व्यक्तिमत्व म्हणून दादांनी आपली एक विशिष्ट छाप समाजावर सोडली आहे अशी स्तुतीसुमने देवेंद्र फडणवीसांनी या पत्रातून उधळली आहेत.
अजित पवार हे सकाळी सात वाजता काम सुरु करणाऱ्यांच्या पक्तीतील व्यक्तिमत्व असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. त्यांनी एकदा कामाचा प्रारंभ केला तर मागे वळून पाहत नाहीत असंही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस आपल्या पत्रात अजित पवारांची स्तुती करताना म्हणतात की, "सरकारमध्ये असताना अनेक कठोर निर्णय घ्यावे लागतात. क्षणिक ते अप्रिय वाटत असले तरी दीर्घकालीन जनहिताचे असतात. अशावेळी राजकीय कौशल्य पणाला लावावं लागतं, व्यवस्थापन कौशल्यात जोखीम आणि हिंमत ठेवावी लागते. असे निर्णय घेण्यात दादा आघाडीवर आहेत. त्यांच्यापुढ फाईल गेली तर दोनच उत्तर येतात, होय किंवा नाही. पाहतो-करतो ही शैली दादांना मान्यच नाही."
देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पत्रात अजित पवारांच्या नागपुरच्या पत्रकार परिषदेचा किस्साही सांगितला आहे. वक्तशीरपणाबद्दल काटेकोर असणारे अजित पवारांनी ठरलेल्या वेळेत येऊन पत्रकार परिषद घेतली अशीही आठवण देवंद्र फडणवीसांनी करुन दिली.
येणाऱ्या प्रत्येकाचे ऐकूण घेण्याचा गुण अजित पवारांनी शरद पवारांकडून घेतला असल्याचं देवेंद्र फडणवीस आपल्या पत्रात म्हणाले. सतत जनसंपर्क आणि कामावर तात्काळ तोडगा हेच अजित पवारांच्या कामाचे सूत्र असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांच्या अनुभव संपन्नतेचा, गतिमानतेचा राज्याला फायदा होईल असा विश्वास आपल्याला वाटत असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी पहाटे शपथविधी घेऊन सरकार स्थापन केल्याचा दावा केला होता. पण नंतर घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर अजित पवारांना माघार घ्यायला लागली होती.
संबंधित बातम्या :