मुंबई : अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी एसटी संपाच्या आंदोलनात वकिलीचा कोट घालून भाग घेतल्याचा ठपका ठेवत त्यांची वकिली दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सीलने हा निर्णय घेतला आहे. सदावर्तेंनी आंदोलनामध्ये भाग घेताना बार कौन्सिलच्या नियमांचं उल्लंघन केल्याची तक्रार अॅड. सुशील मंचरकर यांनी केली होती. त्यानंतर सदावर्ते यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. 


Gunratna Sadavarte: सदावर्तेंची वकिली का निलंबित करण्यात आली?


एसटी आंदोलनात त्यांनी वकिलांचा ड्रेस परिधान करून अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आझाद मैदानात डान्स केला, त्यानंतर त्यांनी एक बैठक बोलवूनही बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तशी तक्रार एक वर्षापूर्वीच करण्यात आली होती. त्यावर आज निर्णय देण्यात आला असून सदावर्ते यांची वकिली दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आली आहे. त्यामुळे अॅड. गुणरत्न सदावर्ते आता दोन वर्षे कोर्टात बाजू मांडू शकणार नाहीत किंवा त्यांना वकिलीचा कोट घालता येणार नाही. 


नियमानुसार या कारणांसाठी रद्द होऊ शकते वकिलीची सनद 


1. जर एखाद्या वकिलाकडून बार कौन्सिलच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचं दिसून आलं तर राज्यातील बार कौन्सिल किंवा बार कौन्सिल ऑफ इंडियाकडून ही कारवाई केली जाते. तसेच वकिलीसंबंधित काही आर्थिक गैरव्यवहार, अशिलाची फसवणूक किंवा इतर काही गैरकृत्य केल्याचं स्पष्ट झाल्यानंतर वकिलीची सनद रद्द केली जाते, किंवा काही कालावधीसाठी निलंबित केली जाते. 


2. एखाद्या वकिलाला कोणत्यातरी गुन्ह्यात दोषी ठरवलं तर आणि त्याला दोन वर्षांपेक्षा अधिक काळासाठी तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यास त्याची सनद रद्द केली जाऊ शकते. 


3. एखादा वकील मानसिकदृष्ट्या किंवा शारीरिकदृष्ट्या अकार्यक्षम असल्यास त्याची सनद रद्द केली जाऊ शकते. 


4. बार कौन्सिलची वर्गणी दिली नाही किंवा देणी दिली नाही तर. 


एखाद्या वकिलाची सनद बार कौन्सिलने निलंबित किंवा रद्द केल्यास त्याला न्यायालयात आव्हान देता येते. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने सदावर्ते यांची वकिली दोन वर्षांसाठी निलंबित केल्यानंतर त्याला सदावर्ते आव्हान देणार असल्याची माहिती आहे. अर्थात सदावर्तेंवर झालेली ही पहिली कारवाई नाही, या आधीही त्यांच्यावर अशा कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बार कौन्सिलच्या या निर्णयानंतर सदावर्ते आता नेमकं काय करणार हे पाहावं लागेल. 


ही बातमी वाचा: