Mahavikas Aghadi Sabh : शिंदे-फडणवीस सरकारविरोधात महाविकास आघाडीने राज्यभरात तिन्ही पक्षांची एकत्रित सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान महाविकास आघाडीच्या या सभांची सुरुवात 2 एप्रिलला छत्रपती संभाजीनगर शहरातून (Chhatrapati Sambhaji Nagar City) होणार आहे. मात्र महाविकास आघाडीच्या एकत्र सभेचा रिलीज करण्यात आलेला टिझर (Teaser) सभेपूर्वीच चर्चेत आला आहे. या टीझरमधून चक्क काँग्रेसचे प्रमुख नेते असलेल्या राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनाच वगळण्यात आले आहे. तर, स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका प्रकरणावरून वाद निर्माण झाल्यानं राहुल गांधी आता महाविकास आघाडीला नकोसे झाली की काय? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहे. 


छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 एप्रिल रोजी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या एकत्र सभेचा टिझर रिलीज करण्यात आला आहे. मात्र यामध्ये राहुल गांधींना स्थान न देता सोनिया गांधींची दृश्यं लावण्यात आली आहेत. टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. त्यासोबतच उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,  विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील आहेत. परंतु संपूर्ण टीझरमध्ये राहुल गांधी मात्र नाहीत.  त्यामुळे, सावरकरांवर टीका प्रकरणावरून वाद निर्माण झाल्यानं राहुल गांधी आता मविआलाच नकोसे झाली की काय?  अशी चर्चा सुरु आहे. तर यावर ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंनी स्पष्टीकरण देत, टीझरमध्ये राहुल गांधी दिसत नसल्याचं म्हणणे चुकीच असल्याचं म्हणत बचाव केला आहे. 


सुटसुटीत पद्धतीने टीझर बनवण्यात आला 


यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, ही तीन पक्षाची एकत्रित सभा आहे. त्यामुळे तीन पक्षाचे तीन नेते यामध्ये आहेत. महाराष्ट्राची सभा असल्याने यात उद्धव ठाकरे आहेत. तर राष्ट्रवादीच्या वतीने अजित पवार असणार असून, काँग्रेसकडून नाना पटोले उपस्थित असणार आहे. त्यामुळे या तीन नेतृत्वाचा या टीझरमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. तर बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी देखील आहेत. त्यामुळे सुटसुटीत पद्धतीने टीझर बनवण्यात आला आहे. त्यामुळे यात राहुल गांधी नाहीत असे म्हणण्याला काहीही अर्थ नसल्याचे अंबादास दानवे म्हणाले. 


आणखी टीझर येणार, त्यात वेगवेगळे लोकं


सोनिया गांधी यांचा फोटो असून, राहुल गांधींचा नाही. या प्रश्नाला उत्तर देताना दानवे म्हणाले की, सोनिया गांधी यांचा फोटो आम्ही लावला आहे. कारण प्रोटोकॉलनुसार सोनिया गांधी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीचे शरद पवार आहेत. तर शिवसेनेचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे. तर उद्धव ठाकरेंचा एक वक्ते म्हणून नाव असल्याचे दानवे म्हणाले. सर्वांचेच फोटो टाकणे शक्य नाही. त्यामुळे हा पहिला टप्पा असून, आणखी टीझर येणार आहेत. तर प्रत्येक टीझरमध्ये वेगवेगळे लोकं असतील असेही दानवे म्हणाले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या :


Chhatrapati Sambhaji Nagar: मोठी बातमी! विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आमदार शिरसाट यांच्यावर गुन्हा दाखल करणार