Gunaratna Sadavarte : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्याकडून अनेक गंभीर आरोप केले जात आहेत. सुरेश धस यांनी बीडमधील एका सांस्कृतिक कार्यक्रमाचा उल्लेख करत अनेक अभिनेत्रींचीही नाव घेतली. यात अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या (Prajakta Mali) नावाचाही समावेश आहे. आता यावरून अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. तर शनिवारी संतोष देशमुख यांची हत्येच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या सर्वपक्षीय मूक मोर्चावरही त्यांनी टीका केली आहे.
गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, आमदार म्हणून शपथ घेतलेले सुरेश धस यांचा जाहीर निषेध. महाराष्ट्रात कलावंतांना अशा प्रकारे अपमानित करण्याचे धारिष्ट धसमध्ये कसे आले? विधानसभेच्या सभापतींनी सुरेश धस यांच्या विरोधात कारवाई करावी. प्राजक्ता माळी यांना माझा पाठिंबा आहे. प्राजक्ता माळी, राश्मिका मंदाना, सपना चौधरी या सर्वांना माझा पाठिंबा आहे. कलावंतांना कोणी अपमानित करत असेल तर त्या लोकांना विरोध करणे, हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. आम्ही कलावंतांसोबत आहोत, असे त्यांनी म्हटले.
बीडमधील मोर्चा वाटला नाही, तो शिमगा
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ शनिवारी बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा आयोजित करण्यात आला. यावरूनही गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार हल्लबोल केलाय. ते म्हणाले की, कालचा धस, जरांगे आणि आव्हाड यांचा मोर्चा स्वतःच्या स्वार्थासाठी होता. कोणालाही न्याय मिळण्यासाठी तो मोर्चा नव्हता. मला तो मोर्चा वाटला नाही, तो शिमगा वाटत होता. मोर्चात शिट्ट्या आणि टाळ्या वाजवण्यात आल्या, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले. तर एखादी आदरांजली सभा असेल तर अशा प्रकारच्या वर्तन असू शकते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
चंद्रकांत पाटलांनी सुरेश धसांना सुनावले खडेबोल
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील सुरेश धस यांना खडेबोल सुनावले आहेत. त्यांनी म्हटलंय की, या प्रकरणात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धस यांना शोभत नाही. सुरेश धस यांना आज मी फोन करणार आहे. सुरेश धस यांनी कोणत्याही महिलेची नाचक्की आणि बदनामी होईल असं बोलता कामा नये. प्राजक्ता माळी यांनी देखील काल प्रेस घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मी सुरेश धस यांना स्वतः विनंती करणार आहे. पार्टीचा आमदार असून देखील तुम्ही असं काम करत आहे. तुम्ही असं करू नये, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
आणखी वाचा
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का? अंजली दमानियांचा फडणवीसांना थेट सवाल