Nashik Crime News : रिक्षांची चोरी करून त्यांना बनावट नंबरप्लेट लावून रिक्षा वापरणाऱ्यास जेरबंद करण्यात नाशिक पोलिसांना (Nashik Police) यश आले आहे. त्याच्याकडून 6 लाख 25 हजार रुपयांच्या रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. गुन्हेशाखेचा युनिट एकने ही कारवाई केली आहे. दरम्यान, नाशिक शहरात बनावट चोरीच्या रिक्षांचा सुळसुळाट असल्याचा पोलिसांना संशय आहे.  


याबाबत अधिक माहिती अशी की, शहर आणि परिसरातून रिक्षांच्या चोऱ्या होण्याचे प्रमाण वाढले असल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी रिक्षा चोरी करणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने गुन्हेशाखा युनिट एकचे पोलीस अधिकारी व अंमलदार रिक्षा चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांचा यांचा शोध घेत असताना पोलीस हवालदार विशाल काठे यांना रिक्षा चोरी करणारा इसम भारतनगर परिसरामध्ये फिरत असल्याची माहिती मिळाली.


सहा लाखांचा मुद्देमाल जप्त


मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार देवीदास ठाकरे, रोहिदास लिलके, पोलीस अंमलदार विलास चारोस्कर, समाधान पवार यांचे पथक तयार करून त्यांनी रिक्षा चोरी करणाऱ्याचा शोध घेतला. यावेळी रामनाथ भाऊराव गोळेसर (40, व्यवसाय रिक्षा चालक, रा. विराज कॉलनी, कॅनडा कॉर्नर, नाशिक) हा त्याच्या ताब्यातील चोरीच्या रिक्षासह मिळून आला. सुरुवातीला त्याच्या ताब्यातून एक रिक्षा जप्त करण्यात आली . त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने चोरी केलेल्या आणखी 5 रिक्षांबाबत माहिती दिली. त्याच्या ताब्यातून एकूण 6 लाख 25 हजार रुपये किमतीच्या एकूण 6 रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. 


दुचाकी चोरणारा जेरबंद


दरम्यान, नाशिक शहरासह विविध भागातून दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्याला जेरबंद करण्यात आडगाव गुन्हे शोध पथकास यश मिळाले आहे. या संशयिताकडून वेगवेगळ्या कंपन्याच्या 9 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. ऑगस्ट महिन्यात नांदुर नाका परिसरातील जनार्दननगर येथील विकास सुभाष तुपसुंदर यांची राहत्या घरापासून दुचाकी चोरी गेली होती. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस हवालदार दादासाहेब वाघ यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, काही दुचाकी मालेगावातील एका संशयिताने चोरी केलेल्या दुचाकी लपवून ठेवली आहे. त्या अनुषंगाने सापळा रचून संशयित कपिल संजय मगरे (37, रा. संविधाननगर भायेगावरोड, ता. मालेगाव, जि. नाशिक) याला ताब्यात घेतले. या संशयिताची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून चोरी केलेल्या 3 बुलेट, 3 होन्डा शाईन, 1 होन्डा लिवो, 1 सुझुकी अॅक्सेस, 1 हीरो डिलक्स अशा 7 लाख 70 हजार रुपयांच्या एकूण 9 मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.


आणखी वाचा 


हवेत गोळीबारप्रकरणी परळीत तिघांवर गुन्हा दाखल, व्हायरल व्हिडिओनंतर बीड पोलिसांना अखेर जाग आली