कोणी दिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना 'फिटनेस चॅलेंज'?
एबीपी माझा वेब टीम | 02 Jun 2018 08:40 AM (IST)
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फिटनेस चॅलेज दिलं आहे
मुंबई : केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी सुरु केलेल्या फिटनेस चॅलेंज मोहिमेनंतर देशभरात 'व्यायामाच्या व्हिडिओं'चं वारं वाहू लागलं आहे. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही फिटनेस चॅलेंज मिळालं आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी फडणवीसांना फिटनेस चॅलेज दिलं आहे. व्यायाम करतानाचा व्हिडीओ ट्विट करत रुपानींनी हे आव्हान दिलं आहे. मुख्यमंत्र्यांना आपला व्यायाम करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करुन आणखी एका व्यक्तीला फिटनेस चॅलेंज द्यावं लागेल. काय आहे फिटनेस चॅलेंज? राज्यवर्धन सिंह राठोड यांनी देशात फिटनेसला प्रोत्साहन देण्यासाठी सोशल मीडियाचा अनोख्या पद्धतीने आधार घेतला. राठोड यांनी व्यायाम करतानाचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर करुन अभिनेता हृतिक रोशन, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल यांना आव्हान दिलं होतं. राज्यवर्धन राठोड यांनी नागरिकांना व्यायाम करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सांगितलं आहे. त्यानंतर आणखी काही जणांना नॉमिनेट करत फिटनेस चॅलेंज देण्यास सांगितलं आहे. अशाप्रकारे ही फिटनेस मोहिमेची साखळी सुरु राहील.