सातारा : गोठ्यात सुकत टाकलेले कपडे काढण्यासाठी गेलेली महिला आणि तिच्या पतीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना सातारा जिल्ह्यातील चिदवली गावात घडली.
तुषार पवार आणि शीतल पवार असं या दाम्पत्याचं नाव असून त्यांना एक वर्षाची मुलगी आहे.
शीतल पवार या गोठ्यात सुकत टाकलेले कपडे काढण्यासाठी गेल्या. गोठ्यात असलेली कडबा कुट्टीची वायर पत्र्याला चिकटली होती. त्या तारेला शीतल यांचा स्पर्श झाला आणि त्यांना विजेचा धक्का बसला.
शीतल यांच्या आवाजाने पती तुषार त्या ठिकाणी आले आणि पत्नीला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांनाही विजेचा धक्का बसला. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. या दाम्पत्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
पावसाळ्यात विजेचा प्रवाह विविध ठिकाणी उतरण्याच्या अनेक घटना घडतात. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. शिवाय शरीरातूनही विद्युत प्रवाह पास होऊ शकतो, त्यामुळे असा काही प्रसंग आल्यास लाकडासारख्या वस्तूंची मदत घेणं किंवा मुख्य ठिकाणाहून विद्युत प्रवाह बंद करणं हा उत्तम पर्याय आहे.