शिर्डी : अवघ्या सव्वा रुपयात लग्न... ही संकल्पना राबविली आहे शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष  कैलास कोते यांनी. गेल्या पंधरा वर्षापासून कैलास कोते हे साईबाबांच्या आशीर्वादान साई चेरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून व शिर्डी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमान सामुदायिक विवाह सोहळा ही संकल्पना राबवत आहेत.


 

यावर्षी संपन्न झालेल्या सोहळ्यात तब्बल 41 जोडपी विवाहबद्ध झाले असून, गेल्या पंधरा वर्षात 1500 हून अधिक नाते जुळवण्यात कोते यांना यश आलं आहे. यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्यान अनेक ठिकाणी सामुदायिक विवाहसोहळे राबवण्यात येत असले, तरी कैलास कोते हे गेल्या 15 वर्षांपासून आपल कार्य अविरतपणे करत आहेत.

 

विवाहसोहळ्यात नोंदणी केलेल्या जोडप्यांना ट्रस्टच्या माध्यमातून संसार उपयोगी वस्तू देण्यात येतात, तर यावर्षीपासून सामूहिक विवाह सोहळ्यात संपन्न झालेल्या जोडप्यांना जर मुलगी झाली, तर तिच्या नावे 5000 रुपयांची पावती करण्याचा उपक्रम  सुरु करण्यात आला आहे.

 

या विवाह सोहळ्यासाठी जिल्हाधिकारी अनिल कवडे, युवा नेते सुजय विखे यासह अनेक जण उपस्थित होते. विवाह सोहळ्यात सर्वधर्मीय विवाह लावण्यात आले, तर यावेळी सोशल मीडियातून ओळख झालेल्या मुकबधीर युवक युवतीचा विवाहही बौद्ध पद्धतीने संपन्न झाला.