जळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. त्यामुळं अर्ज भरण्यासाठी मोठी झुंबड उडल्याचं चित्र असताना जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील वडगाव बुद्रुक या ग्रुप ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी मात्र आपला कोणताही उमेदवारी अर्ज दाखल न करता या निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. ग्रुप ग्रामपंचायतीमुळे विकासाला खीळ बसली असल्याने या ग्रुप ग्रामपंचायतीमधून हिवरे दिगर आणि हिवरखेडा गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत जोपर्यंत शासन करीत नाही तोपर्यंत आम्ही येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार घालणार असल्याचं गावकऱ्यांनी म्हटलं आहे.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील वडगाव बुद्रुक ही ग्रुप ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीमध्ये वडगाव, पिंपळगाव खुर्द ,हिवरे दिगर,आणि हिवरखेडे असा चार गावांचा समावेश आहे. मात्र चारही गाव दूर अंतरावर असलायने या गावातील कोणतीही ग्राम सभा कोरम अभावी पूर्ण होत नाही. कोणत्याही विकास कामासाठी लागणार निधी आणि योजना या गावात येत नाहीत.


ग्रामपंचायतीला स्वतःचं कार्यालय नाही. त्यामुळं गावांचा विकास होत नाही अशा प्रकारच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. या गावाचा जर विकास व्हायचा असेल तर या ग्रुप ग्रामपंचायतीचं विभाजन होणे गरजेचे आहे. यामध्ये हिवरे दिगर आणि हिवरखेडे या दोन्ही गावांची एक ग्रामपंचायत करावी अशी या ठिकाणच्या ग्रामस्थांची मागणी आहे. या मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून येथील ग्रामस्थांचा शासन दरबारी पाठ पुरावा देखील सुरू आहे. मात्र शासनाने अद्याप पर्यंत या बाबत कोणतीही हालचाल केलेली नाही.


त्यामुळं या ठिकाणच्या ग्रामस्थांनी येऊ घातलेल्या निवडणुकीवर बहिष्कार घालत कोणताही उमेदवारी अर्ज भरला नाही. आगामी काळात ही जर शासनाने आपली मागणी मान्य केली नाही तर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.