जळगाव : शिवसेना नेते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी खुर्द गावात ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न फसले. त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा थेट सामना याठिकाणी रंगल्याचं पाहायला मिळालं आहे. 'विकास' आणि 'परिवर्तन' असे दोन पॅनल एकमेकांच्या विरोधात असून, कोणते पॅनल बाजी मारते? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी गावातील निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले होते, पण ते निष्फळ ठरल्याने याठिकाणी शिवसेनेच्या स्वकियांमध्येच लढत रंगली आहे.


'खान्देशची मुलुख मैदान तोफ' म्हणून शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांची राज्यभर ओळख आहे. शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून राज्याच्या राजकारणात यशस्वी डावपेच आखण्यात त्यांची हातोटी असल्याचे मानले जाते. पाळधी बुद्रुक हे गुलाबराव पाटील यांचे मुळगाव आहे. या गावाचाच दुसरा भाग असलेल्या पाळधी खुर्द गावातील ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या दोन्ही गावांमध्ये गुलाबराव पाटील यांच्या शिवसेनेचे वर्चस्व आहे. मात्र, असे असताना गुलाबराव पाटील यांना पाळधी खुर्दची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात अपयश आले. त्यामुळे याठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आता जनमताचा कौल कोणाच्या बाजूने असेल, याची उत्सुकता आहे.


पाळधी खुर्द ग्रामपंचायतीत गेल्या 25 वर्षांपासून शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे शरद कासट यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता आहे. यावेळी त्यांना शिवसेनेचेच कार्यकर्ते आणि गुलाबराव पाटील यांचे समर्थक असलेले दिलीप पाटील यांनी आव्हान उभे केले आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न केले. परंतु, त्यात यश आले नाही. 25 वर्षे एकहाती सत्ता असूनही गावाच्या विकासाचा अनुशेष कायम असल्याचा मुद्दा उपस्थित करून दिलीप पाटील व त्यांच्या समर्थकांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. अखेर, याठिकाणी शरद कासट यांनीही उमेदवारी करण्याचे ठरवल्याने स्वकियांमध्येच लढत रंगली आहे.