उस्मानाबाद : धनंजय मुंडे यांच्या राजीनामा घ्यायचा की नाही घ्यायचा या नाट्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नैतिकतेला प्राधान्य दिलं होतं. परंतु पक्षामध्ये धनंजय मुंडे प्रकरणावरून दोन गट पडतात असं लक्षात आल्यावर शरद पवार यांनी नैतिकते पेक्षा पक्ष हिताला प्राधान्य दिले. ज्या पद्धतीने विरोधी पक्षातली मंडळी धनंजय मुंडे यांच्या मदतीला आली ती पाहाता शरद पवार यांची सुद्धा या मंडळींच्या माध्यमातून अडचण करण्यात आल्याचं दिसतंय. हे सगळं नाट्य हे महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाच्या दृष्टीने एक मोठा अंक ठरू शकतो.
नैतिकतेच्या मुद्यावरून शरद पवार संध्याकाळपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतीलच असे अंदाज बांधले जात होतो. तेवढ्यात दुसऱ्या नाट्याला सुरुवात झाली. ज्या नाट्याने पवारांच्या नैतिक भूमिकेची अडचण झाली. धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिलेवर भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी फसवणुकीचे आणि ब्लॅकमेलिंगचे आरोप करत तक्रार केली. हा योगायोग निश्चित नाही की धनंजय यांच्या बद्दल निर्णय घ्यायच्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ असलेल्या नेत्याने असे आरोप करावेत. नेमके प्रकरण काय आहे याची माहिती घेण्यासाठी पवारांनी दोन पोलिस अधिकाऱ्यांना पाचारण केले आणि तिथेच धनंजय मुंडेवरची कारवाई टळली. दुसरीकडे पंकज मुंडे यांच्या तुलनेत भाजपचे धनंजय मुंडेंवर अधिक प्रेम आहे, हेही दिसले.
भाजपने अजित पवारांना सोबत घेऊन 72 तासांचा सत्तेचा खेळ केला त्यात धनंजय मुंडे हे एक शिलेदार होते. त्यानंतरच्या सत्ता बदलात धनंजय मुंडे मंत्री झाले. पण पक्षात आणि सरकारमध्ये अजित पवारांची पिछेहाट होत असल्याची चर्चा आहे. काल मात्र धनंजय यांच्यावर आरोप होत असताना अजित पवार धनंजय मुंडेंच्या मागे उभे राहिले. बैठकीत निव्वळ आरोप झाले म्हणून राजीनामा घेऊ नये असा युक्तीवाद झाला. पक्षातली मते पाहून पवारांना धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याचा निर्णय तुर्तास मागे घ्यावा लागलाय.
महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्रित आलेले तीनही पक्ष विविध विचाराचे असले तरी सत्ताधारी राष्ट्रावादी आणि शिवसेनेत अधिक गुळपीठ आहे. त्यामुळेच पुढच्या निवडणुका राष्ट्रवादी-शिवसेना सोबतीला घेऊन लढली तर दोन्ही पक्षांना त्याचा फायदा होऊ शकतो. आज सेनेचा मुख्यमंत्री आहे, उद्या राष्ट्रवादीचा होऊ शकतो. यामुळेच राष्ट्रवादीतले गट एकमेकांना शह देतांना दिसत आहेत. धनंजय मुंडेंचं प्रकरण त्याच डावपेचातला एक अंक आहे.
शरद पवार यांनी सार्वजनिक जीवनात जपलेली वैयक्तिक प्रतिमा यावेळी पणाला लागली होती. सुप्रिया सुळे पण महिला सक्षमीकरणाबद्दल बोलतात, तशा वागतात. त्यामुळेच शरद पवार नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा घेतील अशी ज्यांना खात्री होती त्यांना हे प्रकरण धक्काच आहे.
महत्त्वाच्या बातम्या :