मुंबई : राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील पात्र 75 विद्यार्थ्यांना 2024-25 या वर्षासाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी शिवष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय 26 सप्टेंबरलाच राज्य सरकारने जारी केला आहे. ओबीसी संघटनांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा विषय निदर्शनास आणून दिला होता. यानंतर तातडीने बैठक घेऊन पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत शिष्यवृत्ती मंजूर करीत तत्परता दाखविण्यात आली. समाजहिताच्या या तत्परतेबद्दल ओबीसी संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे. 


राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी परदेश शिष्यवृत्ती योजना 2019-20 पासून लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 30 ऑक्टोबर 2023 च्या शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांची संख्या 75 इतकी करण्यात आली आहे. 2024-25 या वर्षाकरिता परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत सुरुवातीला अर्ज मागविण्यात आले. या अर्जांची इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाचे संचालक यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने छाननी करून, अर्जांतील त्रुटींची पूर्तता करून अभ्यासक्रमनिहाय गुणवत्ता यादी तयार केली. ही यादी 10 सप्टेंबरला राज्य सरकारला सादर केली. त्यानंतर इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने 23 सप्टेंबरला झालेल्या बैठकीत पात्र 75 विद्यार्थ्यांची निवड केली आहे. 


विद्यार्थ्यांसाठी अटी व नियमावली


शासनाने निवड केलेल्या या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करण्याची बाब सरकारच्या विचाराधीन होती. याबाबत, 26 सप्टेंबरला यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या शिष्यवृत्तीचा लाभ मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाचा फायदा देशसेवेसाठी करुन देणे आवश्यक राहणार आहे, तशा आशयाचे हमीपत्र लिहून द्यावे लागणार आहे.


परदेशात उच्च शिक्षणाकरीता शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी परदेशातील पदव्युत्तर पदवी किंवा पीएचडी अभ्यासक्रम विहित कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यास मुदतवाढ व वाढीव खर्च दिला जाणार नाही. 


परदेश शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आलेल्या संबंधित विद्यार्थ्यास उच्च शिक्षण घेण्यासाठी ज्या शैक्षणिक संस्थेत / विद्यापीठात अथवा अभ्यासक्रमास मान्यता दिलेली आहे, ते ठिकाण वा अभ्यासक्रम विद्यार्थ्याने परस्पर बदलल्यास संबधित विद्यार्थ्याकडून शिष्यवृत्तीची रक्कम संपूर्णतः वसूल करण्यात येईल. 


परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता (अनुज्ञेय), आरोग्य विमा, जाण्या-येण्याचा विमान प्रवास खर्च व आकस्मिक खर्च (अनुज्ञेय) यांची रक्कम संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे यांनी संबंधित विद्यापीठाकडून प्रमाणित माहिती प्राप्त करून घेऊन, शिक्षण फी संबंधित विद्यापीठाच्या बँक खात्यात आणि निर्वाह भत्ता व अनुषंगिक खर्चाची रक्कम नियमानुसार संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावी.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI