Jejuri Shashan Aplya Dari : जेजुरी येथे होणाऱ्या शासन आपल्या दारी (Shashan Aplya Dari) कार्यक्रमासाठी उभारलेला मंडप काढण्याचे काम सुरु आहे. जेजुरी येथील पालखी तळावर शासन आपल्या दारी हा कार्यक्रम चार वेळा पुढे ढकलण्यात आला होता. 3 जुलै, 8 जुलै, 13 जुलै आणि 23 जुलै अशा या कार्यक्रमाच्या तारखा होत्या परंतु आता या कार्यक्रमासाठी उभारलेला मंडप काढण्यात येत आहे. त्यामुळे आता हा कार्यक्रम कुठे आणि कधी होणार आहे, याची कल्पना स्थानिक प्रशासनाला नाही आहे. 


चार वेळा या कार्यक्रमाची तयारी करण्यात आली होती. तिसऱ्यांदा ज्यावेळी कार्यक्रमाची घोषणा झाली होती. त्यावेळी मंडपाचं काम अंतिम टप्प्यात आलं होतं. चार वेळा रद्द केल्याने या कार्यक्रमासाठी लाखो रुपयांचा खर्च झाला तो संबंधित लोकांकडून वसूल करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरंदर तालुका अध्यक्ष माणिक झेंडे यांनी केली आहे. 


"भाजपने आपल्या पक्षाची प्रसिद्धी करणे आणि शिंदे सरकारची वाहवा करण्यासाठी या कार्यक्रमाचं राज्यभर आयोजन करण्यात येत आहे, असं स्पष्ट मत आहे. मागील काही दिवसांपासून प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्यांकडे कोणतंही काम घेऊन गेलं तर ते शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या तयारीत व्यस्त असल्याचं सांगत होते. त्यामुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागला. अनेकांची कामंदेखील रखडली आहे," असा आरोप  माणिक झेंडे यांनी केला आहे. 


काही प्रमाणात या कार्यक्रमाची तयारी झाली होती. या तयारीसाठी सगळा खर्च करण्यात आला होता. महाराष्ट्रातील सत्तानाट्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यात येणार होते. त्यात पवारांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच जेजुरीत हा कार्यक्रम होणार होता. मात्र ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. बदलत्या राज्याच्या समीकरणानंतर हा कार्यक्रम फार महत्त्वाचा होता. त्यात जेजुरीत म्हणजेच पवारांच्या बालेकिल्ल्यात होणार असल्याने सगळ्यांनाच उत्सुकता होती. मात्र रेड अलर्ट जाहीर केल्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. पुढील कार्यक्रम कधी असेल, यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.


चारवेळा हा कार्यक्रम पुढे ढकलला गेल्याचा सर्वात मोठा फटका हा विद्यार्थ्यांना बसल्याचं दिसून येतं आहे. प्रवेश प्रक्रिया सुरु असताना उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले, नॉन क्रिमिलेअरचे दाखले, आर्थिक दुर्बल गटाचे दाखले, यासांठी विद्यार्थ्यांची प्रचंड धावपळ सुरु असते. पण पुण्याच्या तहसील कार्यालयात पडलेल्या चेहऱ्याने शेकडो विद्यार्थी आणि पालक अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्च्या पाहत असल्याचं दिसत आहे.