नागपूर : राज्यातील शासकीय कार्यालयात (Government office) आता अपहाराच्या घटनांवर आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांना चक्क विशेष प्रशिक्षण देण्याची वेळ आली आहे. कारण, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून कीटकनाशकांसह उपलब्ध करण्यात आलेल्या अन्य साहित्याच्या साठ्याच्या बाबतीत घडणाऱ्या अपहाराच्या घटनांवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे (Agriculture Minister Dhananjay Munde) यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना दिली आहे. त्यामुळे, शासकीय कार्यालयातील अपहाराच्या घटनांची पुन्हा एकदा चर्चा होत आहे.
अकोला जिल्ह्यातील महामंडळाच्या विभागीय कार्यालयात कार्यरत असलेल्या वाशिमकर नामक भांडारपालाने कीटकनाशकांच्या सुमारे 38 लाख रुपयांच्या केलेल्या अपहारावरून आमदार अमोल मिटकरी यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. यावर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर देताना संबंधित भांडारपालास निलंबित करण्यात आले असून, त्याच्यावर विभागीय चौकशी सुरू आहे, तसेच या अपहाराच्या संदर्भात नेमण्यात आलेल्या सत्यशोधक समितीच्या अहवालानुसार संबंधित भांडारपालावर अकोला एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. सोबतच, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून कीटकनाशकांसह उपलब्ध करण्यात आलेल्या अन्य साहित्याच्या साठ्याच्या बाबतीत घडणाऱ्या अपहाराच्या घटनांवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती देखील मुंडे यांनी दिली.
महामंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ मिळावा हा अंतिम उद्देश शासनाचा असतो; मात्र कोणत्याही कर्मचारी किंवा अधिकारी यांनी शासनाची फसवणूक करून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या सामग्रीचा अपहर करत असतील तर अशा अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची सरकार गय करणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले. तसेच, यासंदर्भात कारवाई गतीने पूर्ण केली जावी, तसेच संबंधित दोषी कर्मचाऱ्याने याआधी देखील अशा स्वरूपाचे गुन्हे केले आहेत का, याचाही तपास केला जावा अशी मागणी आमदार प्रवीण दरेकर, आमदार भाई जगताप आदींनी केली असता, सत्यशोधक समितीच्या अंतिम अहवालात सर्वकाही स्पष्ट होईल व दोषीवर कायदेशीररित्या कठोर कारवाई केली जाईल, असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.
इतर महत्वाच्या बातम्या:
कांद्यावरील निर्यातबंदी उठवा, चांगला दर द्या, लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद, शेतकरी आक्रमक