मुंबई : टाटा ट्रस्टकडून राज्यातील कुपोषण संपवण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. स्पॉटलाईट कार्यक्रमांतर्गत टाटा ट्रस्ट कुपोषणाविरूद्ध लढा देणार आहे. पालघरमध्ये कुपोषणाविरोधातील लढाईला यश आल्यानंतर टाटा ट्रस्टने हाच प्रयोग आता महाराष्ट्रभर राबवण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा ट्रस्टच्या या प्रयत्नामध्ये महाराष्ट्र सरकार देखील सोबत असणार आहे. राज्य सरकार एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत टाटासोबत कुपोषण कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
अंगणवाडी कर्मचारी, आशा कर्मचारी आणि सहाय्यक परिचारिका यांच्या मार्फत ग्रामीण भागातील कुपोषित मुलांपर्यंत पोहोचून त्यांना योग्य आहार देण्यासह त्यांच्यावर उपचार देखील करण्यायत येणार आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रत्येक कुपोषित बालकावर देखरेख ठेवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
अंगणवाडी केंद्र हे गर्भधारणेदरम्यान आणि बाळ सहा वर्षांचे होईपर्यंत आईच्या गरजा पूर्ण करण्यासाठीचा पहिला टप्पा आहे. अंगणवाडी सेविका आणि आशा कर्मचारी गरोदर माता आणि लहान मुलांच्या आरोग्यासंदर्भातील गरजांसाठी काम करतात. अंगणवाडी सेविका बालकांना आणि मातांना पूरक पोषण आहार देऊन त्यांच्या वाढीचा पाठपुरावा करत असताता. त्यामुळे या सर्वांची मदत घेऊन टाटा ट्रस्ट कुपोषणाविरूद्ध लढा देणार आहे.
टाटा ट्रस्टच्या स्पॉटलाइट या उपक्रमांतर्गत पालघर जिल्ह्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यात कुपोषित माता आणि मुलांची संख्या जास्त आहे. त्यामुळे स्पॉटलाइट अंतर्गत काम करून हे रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या उपक्रमांतर्गत आरोग्य आणि कुटुंब कल्याण व महिला आणि बाल विकासाच्या सर्वांगीण उद्दिष्टांसाठी काम सुरू असून अंगणवाडी सेविका आणि आशांच्या क्षमता वाढीवर देखील लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.
स्तनपान, सुधारित स्वच्छता पद्धती आणि लसीकरण पूर्ण करण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि आशा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि आशा प्रत्यक्षात घरी जावून भेटी देवून गरोदर महिला आणि मातांना आरोग्याविषयी जागृत करत आहेत. या पथकाने पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील सपने गावात जन्मलेल्या एक महिन्याच्या कुपोषित मुलीला कुपोषणमुक्त केले आहे. सपने गावातील पल्लवीचे जन्मानंतर वजन कमी होते. परंतु, या पथकाने तिच्या कुटुंबीयांना जागृत केले. त्यामुळे योग्य मार्गदर्शनाने केवळ 22 दिवसातच पल्लवीचे वजन सामान्य मुलांसारखे वाढले.
पल्लवीचे पालक प्रथम तिला पोषण पुनर्वसन केंद्रात घेऊन जाण्यास तयार नव्हते. परंतु स्थानिक अंगवाडी सेविका आणि आशा कर्मचाऱ्यांच्या पथकाने त्यांचे समुपदेशन केले. त्यामुळे पल्लवीच्या पालकांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले आणि त्यांनी त्यांच्या मुलीसाठी वैद्यकीय मदत घेण्यास तयार झाले. त्यानंतर आरोग्य पथकाच्या प्रयत्नांमुळे केवळ 22 दिवसांतच पल्लवीचे वजन वाढले.
AAA टीम मासिक ‘ग्राम आरोग्य स्वच्छता आणि पोषण दिन’ (VHSND) सारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये देखील सहयोग करते. विशेषत: उपेक्षित समाजातील महिला आणि मुलांसाठी आरोग्य, स्वच्छता आणि पोषण सेवा एकत्र करण्यासाठी या कार्यक्रमांतर्गत काम केले जाते. आरोग्य पथक प्रसूतीपूर्व आरोग्य तपासणी आणि प्रसूतीनंतर बाळाच्या वाढीवर लक्ष ठेवून असते.