मुंबई : राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला आता सरकारी नोकरीचा लाभ मिळणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून शिवसेनेने ही मागणी केली होती. ज्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.


आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना केवळ परिवहन खातंच नव्हे, तर सर्वच सरकारी विभागांमध्ये क श्रेणीतील नोकरी दिली जाईल. मुख्यमंत्र्यांनी त्याला मान्यता दिली आहे, अशी माहिती दिवाकर रावते यांनी दिली.

फायनन्शियल सेंटर बीकेसीतच होणार : दिवाकर रावते

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातची शान वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील इंटरनॅशनल फायनान्स सर्विस सेंटरचा बळी जाणार असल्याचं दिसत आहे. मुंबईतील बीकेसीत हे सेंटर होणार आहे. पण मोदींच्या बुलेट ट्रेनच्या स्टेशनसाठी बीकेसीतील 0.9 हेक्टर जागा द्यावी लागणार आहे.

मात्र बुलेट ट्रेन आली तरी फायनन्शियल सेंटर होणारच, असं दिवाकर रावते यांनी म्हटलं आहे. बीकेसीतच हे फायनन्शियल सेंटर होईल, त्यासाठी जेवढी जागा बुलेट ट्रेनसाठी द्यावी लागेल, त्याचे पैसे घेतले जातील. त्या पैशातून फायनन्शियल सेंटरची इमारत बांधली जाईल, असं दिवाकर रावते यांनी सांगितलं.