Maharashtra Winter Session 2024 नागपूर : नागपूर येथे येत्या 16 डिसेंबर पासून सुरु होणा-या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापुर्वी आणि अधिवेशनादरम्यान कुठल्याही यंत्रणेने किंवा नागरिकांनी शहरात खोदकाम करु नये, असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे. आपात्कालीन परिस्थितीत काही खोदकाम करणे आवश्यक असल्यास अश्या खोदकामाची महावितरणला पुर्वसुचना दिल्यास होणारे नूकसान टळून ग्राहकांनाही त्रास होणार नाही, असे महावितरणतर्फ़े स्पष्ट करण्यात आले आहे.


नागपूर येथे होणा-या महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान शहरातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणने युद्धस्तरावर तयारी ठेवली असून यासाठी शहरातील सर्व विकास यंत्रणांनी सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. नागपूर शहरात आज मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पाणी पुरवठा, महानगरपालीका, दुरसंचार विभाग, खासगी इंटरनेट आणि केबल टिव्ही कंपन्या यांसारख्या अनेक विभागांमार्फ़त मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरु असून त्यासाठी अनेक ठिकाणी मोठ-मोठ्या ड्रील मशिन्सच्या सहाय्याने खोदकामही करण्यात येत आहे. या खोदकामांमुळे महावितरणच्या भुमिगत वीज वितरण यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून सोबतच अविस्कळीत वीजपुरवठ्यामुळे ग्राहकांच्या रोषालाही सामोरे जावे लागते. 


अधिवेशनापुर्वी तसेच अधिवेशनकाळात खोदकाम टाळा


आज बहुतेक संस्था विकासक किंवा कंत्राटदाराच्या माध्यमातून कामे करीत असल्याने ती कामे लवकर पुर्ण व्हावीत, यासाठी संबंधीत कंत्राटदार प्रयत्नशिल असतो व त्यात तो इतर विभागाशी समन्वय करण्याचे टाळतो, यामुळे विकासकार्यासाठी खोदकाम करणा-या कंत्राटदारांनी, संबंधित संस्थांनी आणि नागरिकांनी देखील अधिवेशनापुर्वी तसेच अधिवेशनकाळात खोदकाम टाळावे, असेही महावितरणतर्फ़े सुचित करण्यात आले आहे. दरम्यान, विधिमंडळ, राजभवन, रवीभवन, नागभवन आणि इतरही भागात अधिवेशन काळात तेथील वीज वितरण यंत्रणा सुरळीत ठेवण्याबाबत महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता अमित परांजपे आणि कार्यकारी अभियंते हेमराज ढोके आणि राजेश घाटोळे, शंकरनगर, धंतोली, सिव्हील लाईन्स, एमआरएस या भागातील महावितरण अभियंते यांनी विधानभवन परिसर आणि इतर संबंधित उपकेंद्रांना भेट देत तेथील संपूर्ण व्यवस्थेचा आढावा घेत सर्व संबंधितांना आवश्यक त्या सुचना केल्या. 


हिवाळी अधिवेशन काळात व्हीव्हीआयपी परिसरात वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी महावितरणकडून येथे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. एका लाइनमध्ये बिघाड झाल्यास दुसऱ्या लाईनमधून वीजपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वीज पुरवठा सुरळीत राखण्यासोबतच कर्मचारी 24 तास कार्यरत राहणार आहेत.  विधीमंडळ, झिरो माईल्स, राजभवन, रामगिरी, देवगिरी, रविभवन, नाग भवन, आमदार निवास, न्यू हैदराबाद हाऊस, मुख्यमंत्री सचिवालय आणि 160 खोल्यांचे गाळे या व्हीव्हीआयपी परिसरातील वीजपुरवठा सुरळित ठेवण्यासाठी वीज यंत्रणा आणि पायाभूत सुविधांच्या देखभालीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. वीजपुरवठ्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे, असे महावितरणतर्फ़े कळविण्यात आले आहे.


हे ही वाचा