नाशिक : नाशिककरांसाठी दिलासादायक बातमी आहे. कधीकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या नाशिकची आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरुय. 39 टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या असून शहरातील कोविड सेंटर्सही महापालिकेकडून बंद करण्यात आले आहेत. नाशिक शहर हे एकेकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट बनले होते. एप्रिल महिन्यात नाशिकमध्ये पहिला रुग्ण आढळून आला होता त्यानंतर टप्प्याटप्याने कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत गेली होती.


जुलै महिन्यापासून तर दिवसागणिक हजारावर रुग्ण रुग्णालयात दाखल होत होते. खाजगी रुग्णालयात बेड्स देखील उपलब्ध होत नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांना वणवण फिरावे लागत होते. एवढेच नाही तर कोरोनामुळे रोज अनेकजण दगावत होते. मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारासाठी अमरधाममध्ये मृतदेहाला प्रतीक्षा करावी लागत होती अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. जिकडे जाईल तिकडे महापालिकेचे प्रतिबंधित क्षेत्राचे फलक, बॅरिकेट्स आणि पोलिसांचा पहारा नजरेस पडत होता.


कोरोनाचे हे संकट कधी दूर होईल याचीच नाशिककर वाट पाहत असतांनाच 2021 सालच्या जानेवारी महिन्यात हे चित्र बदलतांना दिसतंय. एकेकाळी जिथे रोज आठशे ते हजार रुग्ण आढळून येत होते तिथे आज सरासरी शंभर रुग्ण दिसून येताहेत आणि त्यामुळेच कोरोना नियंत्रणात आल्याने तसेच शासकीय रुग्णालयातील बेड्स रिक्त होण्याचे प्रमाण वाढल्याने शासनाच्या सुचनेनूसार शहरातील कोविड सेंटर आता बंद करण्यात येत असून महापालिकेचे समाजकल्याण आणि मेरी वसतीगृहातील कोविड सेंटर पाठोपाठ ठक्कर डोम या जम्बो सेंटरलाही आता टाळे ठोकण्यात आले आहे. ऑगस्ट महिन्यात हे सेंटर सुरु करण्यात आले होते 90 डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी इथे कार्यरत होते.


विशेष म्हणजे नुकताच महापालिकेकडून शहरात सिरो सर्व्हे करण्यात आला होता त्यात 39 टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज असल्याचं समोर आलंय. शहरातील सर्व सहा विभागांमधील नागरिकांचे लोकसंख्येच्या प्रमाणात विभागणी करून झोपडपट्टी व बिगर झोपडपट्टी क्षेत्रातील रक्तनमुने घेण्यात आले होते. नाशिक शहराचे कोरोना नोडल अधिकारी आवेश पलोड यांनी दिलेल्या माहितीनुसार शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनूसार प्रशासनाने राबवलेल्या उपाययोजना तसेच नागरिकांनी घेतलेली खबरदारी हेच रुग्णसंख्या आणि मृत्यूदर कमी होण्यास कारण ठरलय. एकीकडे कोरोनाचा संसर्ग कमी झालाय तर दुसरीकडे कोरोना लसीकरणालाही सुरुवात झाल्याने ही निश्चितच समाधानकारक बाब आहे.


29 जानेवारी 2021 पर्यंत शहरात 1 हजार 14 नागरिकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागलाय. एकूण 75 हजार 651 जणांना कोरोनाची लागण झालीय. त्यापैकी 73 हजार 962 रुग्ण उपचार घेऊन घरी गेले असून सध्या फक्त 675 बाधितांवर उपचार सुरु आहेत. नाशिक शहराची कोरोना मुक्तीकडे जरी वाटचाल सुरु असल्याचं बघायला मिळत असलं आणि कोविड सेंटर जरी बंद करण्यात येत असले तरी मात्र नाशिककरांनो कोरोनाचा धोका अद्याप कायम असल्याने गाफील राहू नका, योग्य ती खबरदारी घ्या.