गोंदिया : तरुणांच्या सेल्फी आणि फोटो काढण्याच्या नादात गोंदिया जिल्ह्यात आठ महिन्यांच्या नर बिबट्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना गोंदियातल्या सडक अर्जुनी तालुक्यातील कोयलारी बिटमध्ये घडली आहे.
तरुणांच्या क्रूरकृत्याचा हा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पाच ते सहा तरुण जंगल परिसरात जखमी बिबट्यासोबत फोटो काढत होते. फोटो काढण्यासाठी तरुणांनी बिबट्याची शेपूट पकडून त्याला फरफटत नेल्याचं दिसत आहे.
या घटनेनंतर वनविभागाला याची सूचना देण्यात आली. वन कर्मचाऱ्यांनी बिबट्यावर उपचारही केले. मात्र परिस्थिती अधिकच खालावल्याने नरबिबट्याचा मृत्यू झाला.
या घटनेचा व्हिडीओ वन विभागाच्या हाती लागताच वन्यप्राण्यासोबत क्रूरकृत्य केल्याप्रकरणी तीन जणांना अटक केली असून अन्य आरोपींचा शोध सुरु आहे. प्रकाश पुराम, लोकेश कापगते आणि आसिफ गोंडील अशी अटकेत असलेल्या तरुणांची नावं आहे.