रायगड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेला आजपासून सुरुवात होणार आहे. रायगड जिल्ह्यातल्या पाचाडमध्ये जिजामातांच्या समाधीचं आणि किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेऊन या यात्रेला सुरुवात होणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, सुनील तटकरे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

जनतेपर्यंत जाऊन सरकारच्या निष्क्रियतेबद्दल सांगण्यासाठी 'निर्धार परिवर्तना'चा या घोषवाक्‍याखाली "परिवर्तन यात्रा' काढण्याची घोषणा जयंत पाटील यांनी केली होती. जयंत पाटील यांनी 28 डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत या यात्रेबाबत माहिती दिली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसची ही परिवर्तन यात्रा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून जाणार आहे. देशातील आणि राज्यातील प्रश्नाबाबत जनतेला जाणीव करुन देण्यासाठी ही यात्रा काढण्यात येणार असल्याचं जयंत पाटील म्हणाले होते. ही यात्रा आगामी निवडणुकीत निष्क्रिय भाजप सरकारच्या परिवर्तनाची नांदी ठरेल, असा विश्‍वास जयंत पाटील यांनी व्यक्‍त केला होता.

आगामी निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसमोर कडवं आव्हान उभं करण्यासाठी या निर्धार परिवर्तन यात्रेची घोषणा केली आहे. कोकणतून या यात्रेला सुरुवात होणार आहे. यावेळी पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.