गोंदिया : गंगा मेश्राम यांचं दु:ख मोठं आहे. कारण प्रसुती झाल्यानंतर अवघ्या काही तासात त्यांना आपलं बाळ गमवावं लागलं. बाळाच्या प्रकृती डॉक्टरांनी वेळीच लक्ष न दिल्यामुळे ते दगावल्याचा आरोप या मातेने केला आहे.
असं दु:ख भोगणाऱ्या गंगाबाई एकट्या नाहीत. तुळशीराम पतेहसुद्धा त्याच वेदनेचे भागीदार आहेत. तब्बल 3 तास डॉक्टरांचा धावा केला, पण त्यांना पाझर फुटला नाही, अखेर पतेह यांना आपल्या बाळाचा मृत्यू बघावा लागला. संतापलेल्या तुळशीराम यांनी रुग्णालयाविरोधात पोलिसात धाव घेतली आहे.
गेल्या दीड महिन्यात गोंदियाच्या गंगाबाई स्त्री रुग्णालयात 34 नवजात बालकांचा मृत्यू झाला. त्यातील
18 बालकं गेल्या 15 दिवसात दगावली आहेत. उपचाराला विलंब होणं, डॉक्टरांचा हलगर्जीपणा याला कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे.
याशिवाय आदिवासी महिलांमध्ये असलेलं कुपोषण, सकस आहाराअभावी होणारी आबाळही कारणीभूत आहेच.
गंगाबाई रुग्णालयात वर्ग एकच्या डॉक्टरांची 3 पदं रिक्त आहेत. तर वर्ग दोनच्या डॉक्टरांची 5 पदं रिक्त आहेत. शिवाय प्रसूतीरोग तज्ज्ञ, क्ष-किरण तज्ज्ञ, रेडिऑलॉजिस्ट ही पदं आजवर भरलीच गेली नाहीत. तर शिपाई आणि मदतनीसांच्या तब्बल 23 जागा रिकाम्या आहेत. त्यामुळे उपचार करण्यावर मर्यादा येत आहेत. शिवाय अत्याधुनिक साधनांची अवस्था भीषण आहे.
आदिवासी भागातलं गंगाबाई रुग्णालय चिमुकल्यांच्या मृत्यूची प्रयोगशाळा झालं आहे. ज्याचं सोयरसुतक
ना डॉक्टरांना आहे, ना आरोग्य विभागाला. नाहीतर 34 नवजात बालकांच्या मृत्यूनंतरही आरोग्य खातं असं ढाराढूर झोपून राहिलं नसतं.