सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला आताच्या हंगामात सोन्याचा भाव मिळताना दिसत आहे. हळदीच्या सौद्यात राजापुरी हळदीस ऐतिहासिक 30 हजार प्रति क्विंटल पर्यंत दर मिळाला आहे. बाजार समिती स्थापन झाल्यापासूनचा हा ऐतिहासिक दर राहिला आहे. त्यामुळे शेतकरी, हळद व्यापाऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. यंदा हळदीची वाढती मागणी, कोरोनामुळे हळदीचे वाढलेले महत्व यामुळे देशांतर्गत आणि परदेशात देखील मोठ्या प्रमाणावर हळद निर्यात होत आहे. यामुळे खऱ्या अर्थाने हळदीला सोन्याची झळाळी आलीय.


सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी राजापुरी हळदीस उच्चांकी 30 हजार प्रतिक्विंटल भाव मिळाला. सरासरी भाव 16 ते 17 हजार रुपये आहे. उच्च प्रतीच्या हळदीस 25 ते 27 हजार असा दर मिळत आहे. यामुळे यंदाच्या हंगामात मार्केट यार्डात हळदीची विक्रमी उलाढाल होण्याची शक्यता आहे.


गेल्या पंधरा दिवसांपासून मार्केट यार्डात हळदीचा हंगाम सुरु झाला आहे. पहिल्यापासूनच हळदीला चांगला भाव मिळत आहे. 15 हजारांपासून सुरुवात झालेला दर 25 हजारांपर्यंत वाढला होता. आज हळदीने ऐतिहासिक झेप घेतली. संगमेश्वर टेडर्समध्ये झालेल्या सौद्यामध्ये कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील मुडलंगी तालुक्यातील गुरलापूर येथील शेतकरी रामाप्पा बसाप्पा मगोंडर यांच्या राजापुरी हळदीला क्विंटलला तब्बल 30 हजार रुपये असा उच्चांकी दर मिळाला.


हळदीचे दर वाढण्यामागची कारणे


- मागील 4-5 वर्षांपूर्वी हळदीचे उत्पादन जास्त झाले, त्यामुळं दर कमी होऊन ते 5200-5500प्रति क्विंटल इतका दर झाला, त्यामुळे लागण कमी झाली.


- मागील वर्षी अतिवृष्टी झाल्याने देखील 20/25टक्के उत्पादन कमी झाले,यामुळे यंदा हळद दरात तेजी दिसून येत आहे.


- राजापुरी हळदीमध्ये करक्यूममचे प्रमाण जास्त असल्याने कोरोना काळात हळदीचे महत्व आणि वापर वाढला. सध्या भारतात आणि परदेशात अँटिबायोटिक म्हणून हळदीचा वापर केला जात असल्याने हळदीच्या पावडरची मागणी वाढली आहे