कोल्हापुर : गोकुळ दूध संघाची आज (30 ऑक्टोबर) सर्वसाधारण सभा सुरु आहे. मात्र या सभेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खुर्च्या बांधून ठेवण्याची वेळ सत्ताधारी गटावर आली आहे. सभेच्या ठिकाणी सभासदांसाठी ठेवण्यात आलेल्या हजारो खुर्च्या आयोजकांनी बांधून ठेवल्या आहेत.


गोकुळची सभा म्हटलं गोंधळ हा ठरलेला असतो. त्यामुळे या सभेच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. या सभेतून मल्टीस्टेटचा मुद्दा आधीच निकाली निघाला आहे. तरीदेखील अनेक मुद्दे असे आहेत, ज्यामुळे वाद होऊ शकतात, त्यामुळे या सभेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

गोकुळच्या सर्वसाधारण सभेत अनेकदा वाद होतात. महादेव महाडिक गट आणि सतेज पाटील गटामध्ये अनेक कुरबुरी आहेत. दोन्ही गटांमधील वादांमुळे  सभेत खुर्च्या, बाटल्या आणि चपलांची फेकाफेक झाल्याच्या घटना याआधी घडल्या आहेत. खुर्च्यांची फेकाफेक, मोडतोड होऊ नये यासाठी हजारो खुर्च्या बांधून ठेवल्या आहेत.

दूध संकलनातील वाढ, सभासदांच्या हितांच्या काही मागण्या आहेत, त्यावर आजच्या सभेत चर्चा होणार आहे. मागण्या विचारात घेऊन अनेक ठराव मांडले जातील, त्यास विरोधही होईल, त्यानंतरही मागण्या मान्य होतात का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महादेव महाडिक गटाची सध्या गोकुळवर सत्ता आहे. त्यांनीच गोकुळ मल्टिस्टेट करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या सर्वसाधारण सभेत यावरुन खूप रणकंदन माजलं होतं. त्यामुळे 30 तारखेला होणाऱ्या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र त्याआधीच गोकुळच्या सभेतील महत्त्वाचा मुद्दा निकाली निघाला आहे. त्यामुळे लढाई आधीच सतेज पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके गटाने बाजी मारल्याचं दिसून येतं आहे.

'गोकुळ'च्या सभेत तुफान राडा, खुर्ची भिरकावून मारहाण

मल्टिस्टेट म्हणजे काय?

- मल्टिस्टेट म्हणजे इतर राज्यात आपल्या संस्थेचा विस्तार करणे

- सहकार कायदा कलम 81 आणि 82 नुसार राज्य सरकारचे नियंत्रण निघून जातं

- केंद्राच्या अधिपत्याखाली संस्था जात असल्याने संचालकांना मुक्त कारभार करता येतो

- त्यामुळे संस्थेच्या सभासदांच्या हक्कावर मर्यादा येण्याची शक्यता अधिक असते

- चुकीचा कारभार केला तर राज्य सरकारला संस्थेवर प्रशासक नेमता येत नाही किंवा कोणतीही कारवाई करता येत नाही

व्हिडीओ पाहा



'गोकुळ'च्या सभेत तुफान राडा, खुर्ची भिरकावून मारहाण