नाशिक : सैन्य भरतीसाठी नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये तरुणांची तुफान गर्दी झाली आहे. भरतीसाठी आलेल्या तरुणांची राहण्याची झोपण्याची सोय नसल्याने अनेकांना रस्त्याच्या कडेला, बसथांब्यावर जिथे जागा मिळेल तिथे रात्र काढावी लागली. 116  इन्फट्री पॅरा बटालियनच्या 63 जागांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. पहिल्याच दिवशी 15 ते 20 हजारहून अधिक तरुण देवळाली कम्पमध्ये दाखल झाले आहेत.

आज म्हणजेच 30 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील तरुणांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. आनंद रोड मैदान ते सह्याद्री नगर जवळील मैदानावर लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वात ही भरती प्रक्रिया होत आहे. यासाठी पोलिस प्रशासनाकडून 3 अधिकारी आणि 60 पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ऐन दिवाळीच्या दिवसात भरती होत असली तरी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो तरुण देशसेवेच्या भावनेने देवळाली कॅम्पमध्ये दाखल झाले आहेत. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आर्मी जवान, स्थानिक पोलिस, होमगार्डचे जवान तैनात होते तरीही गर्दी नियंत्रणाबाहेर जात होती. त्यामुळेच चेंगराचेंगरी, ढकलाढकलीचे प्रकार घडले.  यातूनच कुणाला तुडवून तरुण पुढे जात होते, कुणी जखमी होत होतं तर कुणी थेट नाल्यात पडत होतं.

पहाटे चार वाजता भरती प्रकियेला सुरुवात होणार होती. मात्र गर्दी वाढत असल्याने मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास प्रकियेला सुरुवात करण्यात आली.