कोल्हापूर : एक वेळेस आमदारकी नको पण गोकुळ दूध संघाचे संचालक पद द्या, अशी म्हण पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्षे रूढ झालेली आहे. याला कारणही तसंच आहे. संपूर्ण राज्याला गाय आणि म्हैशीचं सकस दूध पुरविणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील बलाढय गोकुळ दूध संघ म्हणजे लक्ष्मी लाभ आणि राजकारणातील उत्कर्ष. विविध राजकीय पक्षातील प्रमुख नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा डोळा असणाऱ्या गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज संपन्न होत आहे. या सभेसाठी खुर्च्या बांधून ठेवण्याची वेळ आली आहे. थोड्याच वेळात गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरुवात होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर होणारी सभा वादळी होण्याची शक्यता आहे. सभेच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


या सभेतील पूर्वानुभव पाहता पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गोकुळच्या व्यवस्थापनाने सभेसाठी ठेवलेल्या हजारो खुर्च्या एकमेकांना बांधून ठेवल्या आहेत. गोकुळची सर्वसाधारण सभा आणि वाद हे समीकरण पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सभेत खुर्च्यांची फेकाफेक होऊ नये यासाठी या खुर्च्या बांधून ठेवल्या आहेत. तर संपूर्ण सभामंडपात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.


स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्या संकल्पनेतून 58 वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची उभारणी झाली. या दूध संघामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना एक आर्थिक पाठवलं मिळालं. अल्पावधीत मध्येच गोकुळ दूध संघाकडे जिल्ह्यातील 60 टक्क्याहून अधिक शेतकरी आपल्या गाय आणि म्हशीचे दूध घालू लागले त्यामुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासह मुंबईसारख्या महानगराला ही गोकुळ दुध संघ सकस दूध पुरवठा अखंडपणे करू लागला आहे. दररोज 14 लाख लिटर हून अधिक दुधाचं संकलन होत असून यामध्ये गाय आणि म्हैस यांच्या दुधाचा समावेश होतो.


गोकुळ एक सत्ताकेंद्र


गेल्या पंचवीस वर्षाहून अधिक काळ काँग्रेसचे माजी आमदार महादेवराव महाडिक यांची सत्ता गोकुळ वर एक हाती होती. त्यांना आव्हान दिलं ते काँग्रेसचे तरुण आमदार सतेज पाटील यांनी. आणि इथूनच गोकुळ दूध संघाचे राजकीय दूध तापू लागलं. सध्या गोकुळ दूध संघ हा महादेवराव महाडिक यांच्या ताब्यात जरी असला तरी तो दूध संघ काढून घेण्यासाठी सध्याचे काँग्रेस चे गृहराज्यमंत्री सतेज पाटील , राष्ट्रवादीचे नेते ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कंबर कसली आहे. तर माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासोबत त्यांचे पुतणे माजी खासदार धनंजय महाडिक हे गोकुळच्या रणांगणामध्ये शड्डू ठोकून उभे आहेत. महाडी गटासोबत केवळ गोकुळ दूध संघाच्या राजकारणापुरते काँग्रेसचे आमदार पी.एन.पाटील देखील आहेत.


गोकुळ दुध संघ आणि वाद


गोकुळ दुध संघ हा आपल्या गटाकडे राहावा यासाठी महादेवराव महाडिक गट आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा गट नेहमी आमने-सामने येत असतो. सर्वसाधारण सभेमध्ये हे दोन्ही गट एकमेकांसमोर भिडत असतात. शेतकऱ्यांच्या हितासाठी हा दूध संघ आपल्याकडे असावा असं दोन्ही गटांचे म्हणणं आहे.


गेल्या चार वर्षांपासून गोकुळ दुध संघ हा मल्टीस्टेट करावा या मुद्द्यावरून महाडिक आणि पाटील गट आमने-सामने येत होता. मात्र त्याला होणारा राजकीय विरोध पाहता भविष्यात आपण अडचणीत येऊ नये यासाठी महाडिक गटाने गोकुळ दूध संघ मल्टीस्टेट करण्याचा निर्णय थोडा मागे घेतला त्यामुळे गोकुळ दूध संघाचे राजकारण थोडसं थंडावले होतं. मात्र यंदाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये दूध संघाच्या संचालक मंडळाकडून आणि प्रशासनाकडून होणाऱ्या वारेमाप खर्चाचा मुद्दा समोर ठेवत पुन्हा पाटील गट उभा राहणार असल्याची चर्चा सभासदांमध्ये आहे.गोकुळ दूध संघावर आपलं वर्चस्व असणं म्हणजे जिल्ह्यातील आर्थिक नाड्या या आपल्या गटाकडे असतात त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात गोकुळ दुध संघ आणि जिल्हा बँकेत भोवती बहुतांशी राजकारण फिरत असतं.


दूध संघाचे अर्थकारण


गाया आणि म्हैस यांच्या दुधाच्या विक्रीतून आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीतून दूध संघाला मोठा आर्थिक फायदा होतो.


संचालक मंडळाला दर महिन्याला ठराविक रक्कम पोहोच होते


दूध वितरणासाठी लागणाऱ्या टँकरची मालकी बहुतांश संचालक मंडळाच्या सदस्यांची असते त्यामुळे यातून शाश्वत कमाई होत असते.


58वी वार्षिक सर्वसाधारण सभा


दरवर्षी गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा ही ताराबाई पार्क इथंल्या मुख्य कार्यालयाच्या परिसरात भरविण्यात येत असते. यंदा मात्र कोरोना च्या पार्श्वभूमीवर ही सभा 3 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता कागल इथल्या संघाच्याच महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याच्या भव्य परिसरात घेण्यात येणार आहे. सभेसाठी येणाऱ्या सर्व सभासदांना सुरक्षित अंतर ठेवून बसण्याचे नियोजन याठिकाणी करण्यात आले आहे. सभेच्या ठिकाणी येण्याअगोदरच सर्व सभासदांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येणार आहे. तसेच सदस्यांना मास्क आणि सॅनिटायझर वापरणे बंधनकारक आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर या सभेमध्ये पुन्हा धुमश्चक्री होऊ नये यासाठी जिल्ह्यातील पोलीस दल तैनात करण्यात आलेला आहे.