मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा चांगलाच वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोना संसर्गामुळे आधीच हैराण असलेले नागरिकांना आता उष्णतेचा सामना करावा लागत आहे. मुंबई शहरासह, नाशिक, सोलापूर, अकोला, सिधुदुर्ग, रत्नागिरीत उकाडा वाढला आहे. पुढच्या काही दिवसांत उष्णता आणखी वाढणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.


मुंबईत पारा 40 अंशांवर 
हवामान खात्याच्या वतीनं ट्विट करत के.एस. होसाळीकर यांनी याबाबतची माहिती दिली. मुंबईचा पारा शनिवारी दुपारच्या सुमारास 40 अंशांवर पोहोचला असून, पुढच्या काही तासांत तापमानात आणखी वाढ होणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. ट्विटरच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार मार्च महिन्यातील सर्वाधिक म्हणजेच 41.7 अंश सेल्शिअस तापमानाची नोंद 1956 च्या सुमारास करण्यात आली होती. ज्यानंतर अनेक वर्षांनी पुन्हा एकदा उन्हाचा तडाखा अधिक प्रमाणात जाणवू लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सध्या राजस्थानकडून महाराष्ट्राच्या दिशेनं जे कोरडे वारे वाहत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात उष्णतेची लाट आल्याची माहिती हवामान खात्याचे उपमहासंचालक जयंता सरकार यांनी दिली आहे.


अकोल्यात उडाका वाढला
महाराष्ट्रातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये गणलेल्या अकोल्यात आता उन्हाच्या झळा जाणवतायेत. अवकाळी पावसानंतर परत अकोल्याचा पारा चढायला लागलाय. आज अकोल्याचं कमाल तापमान 40.4 इतकं नोंदवल्या गेलंय. यावर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच अकोल्याचा पारा 40 अंशावर गेला आहे. यामुळेच यावर्षीचा अकोल्यातील उन्हाळा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाबरोबर आता अकोलेकरांना वाढत्या उन्हासोबतही झगडावं लागण्याची चिन्ह दिसत आहे. ऊन वाढत असल्याने थंड पेयांची विक्री वाढलीये. त्यामुळे पुढच्या काही दिवसात अकोल्याचा पारा आणखी किती वर चढतोय? याची उत्सुकता लोकांना लागलीय. 


सोलापुरात आज पारा पुन्हा चाळीशी पार गेला आहे. आज सर्वाधिक 40.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. काल देखील पारा 40.3 अंश सेल्सिअस वर होता. त्यामुळे आगामी काळात पारा आणखी वर चढण्याची शक्यता आहे. तर नाशिकमध्ये यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद झालीय. आजचे कमाल तापमान 38.2 सेल्सिअस इतके होते.


रत्नागिरी जिल्हावासियांना उन्हाच्या झळा
रत्नागिरी जिल्हावासियांना सध्या उन्हाच्या झळांचा सामना करावा लागत आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील तापमान हे 39 अशं डिग्री सेल्सिअसला जाऊन पोहोचलं आहे. दरम्यान, 25 ते 27 मार्च दरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील हवामान विभागानं दिला असून यावेळी नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे. दिवसा वाढलेल्या तापमानाचा परिणाम रात्रीच्या तापमानावर देखील होत आहे. वाढत्या झळांमुळे आता रसवंती गृह आणि लिंबू सरबताच्या दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी वाढताना दिसत आहे.